लोणीकंद – श्रीक्षेत्र तुळापूर व श्रीक्षेत्र वढू येथील धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज समाधीस्थळ हे महाराष्ट्रातील शिव शंभू भक्तांचे शक्तिस्थळ आहे. येथील समाधी स्थळांचा विकास करणे हे आपले आद्य कर्तव्य समजून महायुतीच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्फूर्ती स्थळांचे उद्घाटन केले आहे. विधानसभा निकालानंतर महायुतीचे सरकार स्थापन झाल्यावर सर्वात पहिले समाधी स्थळावरील कामांना गती देणे हाच आपला ध्यास असल्याचे महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांनी प्रचार दौर्यादरम्यान बोलताना सांगितले. शिरूर-हवेतील विधानसभेच्या प्रचारात रंगत येऊ लागली आहे. माऊली कटके यांच्या प्रचार दौर्याला दोन्हीही तालुक्यांतील गावांत प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आज श्रीक्षेत्र तुळापूर, फुलगाव, वढू खुर्द, पेरणे, डोंगरगाव, पिंपरी सांडस, बुर्केगाव, न्हावी सांडस, सांगवी सांडस, शिरसवडी, बिवरी, वाडेगाव या गावांत कटके यांचा प्रचार दौरा पार पडला. यावेळी पुणे जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, भाजपा क्रीडा आघाडी अध्यक्ष संदिप भोंडवे यांसह पेरणे-वाडेबोल्हाई जिल्हा परिषद गटातील महायुतीमधील असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.