पुणे जिल्हा : देवदत्त निकम आमदारकी डोळ्यासमोर ठेवून 25 वर्षे माझ्यासोबत फिरले

सहकारमंत्री वळसे पाटील यांची टीका
मंचर –आपण मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत देवदत्त निकम यांना सभापतीपद देऊन चूक केली. त्यांनी तेथे मनमानी कारभार केला. व्यापार्यांचा रोष ओढवून घेतला. धना-मेथीचा बाजार बंद पाडला. केवळ आमदारकी डोळ्यासमोर ठेवूनच ते माझ्यासोबत तालुका फिरले, अशी टीका सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विरोधणी उमेदवार देवदत्त निकम यांच्यावर केली.
यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, विष्णू हिंगे, दत्ता थोरात, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंग एरंडे, अरुण गिरे, उपसभापती सचिन पानसरे, बाळासाहेब बाणखेले, सुनील बाणखेले, सागर थोरात, गणेश थोरात, संतोष पिंगळे, रोहन थोरात, राजूशेठ भंडारी, लक्ष्मण बाणखेले, आडत व्यापारी असोसिएशन, हमाल, मापाडी संघटनांचे अध्यक्ष, सचिव यावेळी उपस्थित होते.
वळसे पाटील पुढे म्हणाले, बाजार समितीत आपण प्रकाश घोलप, स्व. वसंतराव भालेराव यांना सभापतीपदे दिली. त्यांनी तेथे चांगले काम करून दाखवले. देवदत्त निकम यांना भीमाशंकर कारखान्यात अध्यक्षपदाची केवळ पाच वर्ष संधी द्यायची होती. त्यानंतर पुढील पाच वर्षे शिवाजीराव ढोबळेंना संधी द्यायची होती; परंतु निकम यांनी गयावया करून दहा वर्षे अध्यक्षपद सोडले नाही.
तालुक्यातील गावा गावात गटबाजी करण्याचे त्यांनी काम केले. माझ्याबरोबरच 25 वर्षे तालुक्यात फिरून केवळ मतांवरच डोळा ठेवून आमदारकीचे स्वप्न पाहिले. त्यांनी बंद पाडलेला धना मेथी, जनावरांचा बाजार आपण पुन्हा सुरू केला. याचा तालुक्यातील शेतकर्यांना चांगला फायदा होत आहे. व्यापारी, व्यापार्यांच्या संघटनांनी संबंधित शेतकरी मतदारांशी जाऊन, भेटून मताधिक्य वाढविण्यासाठी प्रयत्न करावा.
व्यापारी संजय मोरे म्हणाले, दिलीप वळसे पाटील यांनी तालुक्यात जलक्रांती, हरितक्रांती केली. आज मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. रोजगार उपलब्ध झाला आहे. त्याचे श्रेय वळसे पाटील यांनाच जाते. यामुळे बाजार समिती आणि शेतकर्यांचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला. आता सर्व व्यापार्यांनी वळसे पाटील यांनाच आपला पाठिंबा देण्याचा निर्धार केला आहे.
विष्णू काका हिंगे म्हणाले दिलीप वळसे पाटील यांनी भीमाशंकर कारखाना उभारून स्वतःच्या घरात कधी चेअरमनपद ठेवले नाही. निकम यांना दहा वर्ष कारखान्यात चेअरमनपद दिले. त्याची जाण त्यांना राहिली नाही. याप्रसंगी जयसिंग एरंडे, बाळासाहेब खिलारी, नितीन थोरात, आदींची मनोगते झाली. सूत्रसंचालन सागर थोरात यांनी केले.





