पुणे जिल्हा : उदासीन शासन, अकार्यक्षम लोकप्रतिनिधी

राजगुरूनगरातील पाणीयोजना पाच वर्षांनंतरही मार्गी लागेना
रामचंद्र सोनवणे
राजगुरूनगर – खेड तालुक्यात 100 पेक्षा अधिक गावांत जलजीवन पाणी योजना राबवल्या. अनेक अडचणी असताना गावागावांतील सुमारे 300 कोटी रुपयांचा निधी आला पैकी वर्षभरात 70 गावांत जलजीवन मिशनच्या पाणी योजना सुरू झाल्या काही प्रगतीपथावर आहेत असे असताना तालुक्याची राजधानी असलेल्या राजगुरूनगर शहराची पाणी योजना मात्र अडकून पडली आहे. उदासीन शासन, अकार्यक्षम लोकप्रतिनिधी आणि त्यांचे बाहुले बनलेले अधिकारी त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना चासकमान धरणातून होणार्या योजनेचे स्वच्छ मुबलक मिळत नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया राजगुरूनगरवसईय देत आहेत.
खेड तालुक्याची राजधानी असलेल्या राजगुरुनगर शहराला चास कमान धरणाततून पाणी पुरवठा करणारी योजनेचे पाणी नागरिकांना कधी मिळणार की नाही, अजून किती दिवस दूषित पाणी नशिबी असणार, असा खडा सवाल शहरातील नागरिक करीत आहेत तर ही योजना अधिकार्यांचा नाकर्तेपणा आणि राजकीय नेत्यांची श्रेय वादाच्या लढाईत अडकून पडली आहे. वर्षामागून वर्षे होत आहेत; मात्र राजगुरुनगर शहराला स्वच्छ मुबलक पाणी मिळत नाही.
अजूनही दुर्गंधीयुक्त आणि अस्वच्छ फिल्टर विरहित पाणी नागरिकांच्या नशिबी आहे. अनेक नागरिक या पाण्यापासून विविध आजारांनी त्रस्त आहेत. स्थानिक नागरिकांना मात्र नगरपरिषदेचे अधिकारी हुलकावण्या देत आहेत, तर राजकीय नेते आश्वासनांच्या फैरी झाडात आहेत. आम्ही योजना केली पाणी आम्हीच पाजणार अशी भूमिका घेणारे; मात्र जार, बिसलेरी पाणी पिऊन त्यांची तहान भागवत आहेत तर श्रेयवादात सर्वसामान्य नागरिकांचे मात्र हाल आहेत.
केवळ 18 महिन्यांचाच कालावधी होता
राजगुरूनगर शहराला चासकमान धरणातून पाणीपुरवठा करणारी योजना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाभियान अंतर्गत दि. 29 ऑगस्ट 2018 रोजी 17 कोटी 96 लाख रुपये प्रशासकीय मान्यता मिळाली होती. एस. के. एटरप्रायझेस यांना हे काम देण्यात आले होते तर केवळ 18 महिने या योजनेचा कालावधी होता. 2 फेब्रुवारी 2019 ला या योजेनचे भूमिपूजन झाले होते. मात्र अजूनही ही योजना पूर्ण झाली नाही आणि नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळाले नाही. नगरपरिषदेचा तत्कालीन अधिकारी वर्ग याकडे फारसे लक्ष देत नाहीत. तर याचेच भांडवल मतांसाठी होईल या आशेवर पाणीयोजना मार्गी लावण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न केले जात नाहीत. तर अजूनही किती कालावधी उलटणार हे देवच जाणे, असे राजगुरूनगरवासीय म्हणत आहेत.
निवडणूक आली की पाणीयोजनेचे होते भांडवल
लोकसभा निवडणूक आली आणि झाली. दरम्यान, निवडणुकीपूर्वी तरी पाणी मिळेल या आशेवर शहरातील नागरिक होते; मात्र ही आशा आता मावळली असून आता विधानसभा आणि नगरपरिषदेच्या निवडणुकीकडे नागरिक डोळे लाऊन बसले आहेत. विधानसभा, नगरपरिषद निवडणूक लागल्या की राजगुरूनगरच्या पाणी योजनांचे राजकीय नेते भांडवल करून श्रेयवादाची लढाई करतील यात सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा नवी आश्वासने मिळतील मात्र तसे आता होणार नाही शहरातील जनतेने खूप सोसले आहे. आता ते सोसणार नाहीत. या निवडणुकांमध्ये ज्यांनी आश्वासने दिली श्रेयवादाची लढाई केली त्यांना त्यांची जागा नक्की दाखवतील असे चित्र आहे
एक्सप्रेस फिडरमुळे दोन वर्षांपासून योजना रखडली
चासकमान धरणातून पाणी उपसा करण्यासाठी विजेची कमतरता होती त्यासाठी एक्सप्रेस फिडरची गरज होती त्यासाठी चार ते पाच वेळा टेंडर रिकॉल झाले होते, यात मोठा कालावधी गेला. या योजनेचे काम 99 टक्के पूर्ण झाले आहे. मागील वर्षभर हे काम करण्यात गेले. आता पुन्हा पावसाळा आला त्यामुळे हे काम रखडणार आणि राखडवले जाणार, अशी सर्वसामान्य नागरिकांची भावना झाली आहे. त्यामुळे पुढील काहीदिवस नागरिकांना अस्वच्छ आणि दूषित व प्रमाणाच्या पेक्षा कमी पाण्यात पुढील काही दिवस काढावे लागणार आहेत. एक्प्रेस फिडरसाठी ही योजना गेली दोन वर्षांपासून रखडली आहे तिचे काम मागील महिन्यात पूर्ण झाले आहे. डबल्यूसीआर (WCR) पूर्ण करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्याची फाइल महावितरण, सर्कल कार्यालय पुणे यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. पुढील काही दिवसात फिडर चालू होईल, असे नगर परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी सांगितले.





