पुणे जिल्हा : डेंग्यू, हिवताप व चिकनगुनियांनी नागरिक हैराण

योग्य आहार व पाणी शरिरात असणे गरजेचे – डॉक्टरांचे मत
सोरतापवाडी –पूर्व हवेलीतील सर्वच गावांमध्ये साथीच्या आजाराचा प्रादूर्भाव वाढला असून गेल्या काही दिवसांपासून डेंग्यू, चिकनगुनिया, हिवताप, पांढर्या व तांबड्या पेशी कमी जास्त होणे अशा रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. वरील सर्व आजारांचे रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्र लोणी काळभोर, कुंजीरवाडी व उरुळी कांचन येथे वाढले असून जिल्हा आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सर्व्हे करण्याचे काम केले पाहिजे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
थंडी, ताप, खोकला, अंगदुखी इत्यादी आजाराचे रुग्ण असून काही ठिकाणी डेंग्यूचे रुग्ण जास्त आढळले आहेत. यावर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी आरोग्य विभागाने दखल घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. दरवर्षी साधारण सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर ऊन ऑक्टोंबर हिट सारखे वातावरण चालू होते त्यामुळे ऊन पडत असल्यामुळे डासांची अंडी तयार होऊन पोषक वातावरण तयार होण्यास मदत मिळते त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव जास्त असल्यामुळे डेंग्यू, हिवताप, चिकनगुनिया, पांढर्या व तांबड्या पेशी कमी जास्त होणे, असे आजार वाढत असल्याचे मत कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. मेहबूब लुकडे यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सर्व ग्रामपंचायतींनाऔषध फवारणी करण्याचे आदेश देऊन आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून घरोघरी जावून सर्व्हे सुरु करावा, असे सोरतापवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते सुभाष कड यांनी सांगितले. हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्याचे रुग्ण आढळून आल्यास प्राथमिक आरोग्य केंद्रात संपर्क करण्याचे तसेच तीव्र ताप, डोकेदुखी, सांधे, अंगदुखी, अंगावर लालसर पुरळ येणे, डोळ्याच्या आतील बाजूस दुखणे, रक्तातील पांढर्या पेशी कमी होणे. यांसारखे आजार आढळून आल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन रुग्णांनी तपासणी करण्याचे आवाहन डॉ. डी. जाधव व डॉ. मेहबूब लुकडे यांनी केले. नागरिकांनी पण काळजी घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
डेंग्यू आजारात निगेटिव्ह सदृश्य रिपोर्ट येत असून थंडी, ताप, कंबर, पाय दुखणे अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवावे चिकनगुनिया व डेंग्यू तपासणीमध्ये यावेळी वेगळा व्हेरियंट दाखवत असून नाक व चेहर्यावर काळे पडत आहेत तसेच योग्य तो आहार घेऊन भरपूर पाणी पिणे व विश्रांती घेणे गरजेचे आहे. वरील लक्षणे दिसल्यास रक्ताची त्वरित तपासणी करणे गरजेचे असल्याचे मत गणराज हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. समीर ननावरे यांनी सांगितले.
गावात फवारणी केली असून ती तशी चालू ठेवणार आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेऊन डेंग्यू, चिकनगुनिया व हिवताप असे रुग्णा आढळल्यास ग्रामपंचायतीला व प्राथमिक आरोग्य केंद्रास कळविणे.
-अश्विनी चौधरी, सरपंच नायगाव
गावात आरोग्य विभागामार्फत सर्व्हे चालू असून औषध फवारणी चालू आहे. नागरिकांनी डेंग्यू रुग्ण आढळल्यास त्वरित ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्रात माहिती द्यावी. त्यामुळे पुढील उपाययोजना करण्यास सोपे जाईल. तसेच कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रा तर्फे घरोघरी डेंग्यू साठी उपाययोजना करण्यात येत आहे.
-पल्लवी चौधरी, सरपंच पेठगाव





