पुणे जिल्हा : इंदापूर तालुक्यात बरसले मृग नक्षत्र

-दमदार पावसाने शेतकरी वर्गात आनंद
इंदापूर – इंदापूर तालुक्यात पहिल्यांदाच यंदा शुक्रवार (दि. ७) पासून रविवारीपर्यंत,मृग नक्षत्राने पावसाळ्याला सुरुवात झाली आणि मृग नक्षत्राच्या पहिल्याच दिवशी इंदापूर शहरासह तालुक्यात जोरदार पाऊस बरसला. वादळी वाऱ्यासह मृगाच्या सरी बरसल्याने नागरिकांना काही प्रमाणात का होईना पण उकाड्यापासून दिलासा मिळाला.
इंदापूर तालुक्याच्या हद्दीत नीरा आणि भीमा या दोन नद्या आहेत. मात्र, या नद्यांना पाणी असतेच असे नाही. खरे तर ह्या दोन्हीही नद्या,पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहेत.त्यामुळे अवर्षण प्रवण क्षेत्रातील शेतकरी,पावसाची चातकासारखी वाट बघतो. यंदा तीच परिस्थिती नागरिक शेतकरी यांच्यावर आली होती. मात्र, मृग नक्षत्राच्या पहिल्या दिवशी मृगाच्या सरी कोसळल्या, यंदा पावसासाठी जास्त प्रतिक्षा करावी लागली नसून, पहिल्याच दिवसापासून सलग तीन चार दिवस सायंकाळी आणि रात्री आकाशात मुगाचे नभ दाटून येत आहेत.त्यामुळे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे.
यंदा इंदापूर तालुक्यात हजारो हेक्टरवर खरीप पेरणीचे नियोजन असून, त्या अनुषंगाने रासायनिक खते व बियाणे उपलब्ध करून देण्यात आले आहे. आतापर्यंत पाऊस न आल्याने शेतकऱ्यांनी खत व बियाणे खरेदीसाठी गर्दी केली नव्हती. परंतु शुक्रवारी रात्री पाऊस बरसल्याने शनिवारी इंदापूर शहरासह ग्रामीण भागातील कृषी सेवा केंद्रात खते व बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसून आली आहे.
सध्या परिस्थितीत शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागत अंतिम टप्प्यात असून, पेरणीसाठी शेतकरी पुरेशा पावसाची प्रतीक्षा करित आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही दिवस चांगला पाऊस बरसणार असल्याने लवकरच पेरणीचा श्री गणेशा होण्याचा अंदाज शेतकऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.
उजनी मात्र कोरडेच…
पावसाने जर इंदापूर तालुक्यात व पुणे शहराच्या वरच्या परिसरात साथ दिली तर,उजनी जलाशय भरणार आहे.उजनी जलाशयाने इतिहासात मोठा तळ गाठला आहे. या जलाशयाला यशवंत सागर म्हटले जाते. मात्र, आडात नाही तर पोहऱ्र्यांत कुठून येणार, अशी अवस्था यंदा उजनी धरणाची झालेली दिसून येते. धरणात पाणीसाठा नसल्यामुळे दुष्काळी 22 गावातील शेतीसाठी नागरिकांसाठी शासनालाही पाणी सोडता आले नाही. त्यामुळें नागरीकांची,शेतीची तहान फक्त पाऊसच भागवू शकतो हे मात्र निश्चित.





