Pune District : आंबेगावात ओला दुष्काळ जाहीर करा

शेतकर्यांचे तहसीलदारांना निवेदन ः सोयाबीन आणि भात पिकांचे मोठे नुकसान
मंचर – आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागांमध्ये यावर्षी पावसाच्या अनियमितपणामुळे शेती पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. विशेषतः सोयाबीन आणि भात पिकांवर याचा सर्वाधिक परिणाम झाला असून, शेतकर्यांनी शासनाकडे ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात तहसीलदार संजय नागटिळक यांना घोडेगाव तहसील कार्यालयात मंगळवारी (दि. 8) निवेदन देण्यात आले.
शेतकर्यांसोबत समाजकल्याणचे माजी सभापती सुभाष मोरमारे, संजय गवारी, प्रकाश घोलप, नंदकुमार सोनावले, प्रदीप आमोंडकर, प्रवीण पारधी, धनंजय फलके, जितेंद्र गायकवाड उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या पावसाळ्यात पाउस सातत्याने पडत राहिला आणि त्यानंतर अचानक अतिवृष्टी झाल्याने पिकांची वाढ खुंटली आहे. पेरणीनंतर सततच्या पावसामुळे रोपांची उगवण कमी झाली तसेच उगवलेली रोप मारल्याने काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागली,
तर काही ठिकाणी पेरणी वाया गेली. जे पीक उगवले, तेही अनियमित पावसामुळे पूर्णपणे वाढू शकले नाही. आदिवासी पट्ट्यातील शेतकरी प्रामुख्याने पावसावर अवलंबून असल्याने, त्यांच्या उपजीविकेचे साधन असलेल्या या पिकांच्या नुकसानीमुळे त्यांच्यासमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे. अनेक शेतकर्यांनी कर्ज काढून शेती केली होती, मात्र आता पिकांच्या नुकसानीमुळे ते मोठ्या अडचणीत सापडले आहेत.
स्थानिक शेतकर्यांच्या म्हणण्यानुसार, पिकांची स्थिती पाहता, यंदा उत्पादन मिळणे अशक्य आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा आणि शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. या गंभीर परिस्थितीकडे शासनाने लक्ष देऊन तातडीने उपाययोजना करावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत. शासनाने याची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल.
-संजय गवारी, माजी सभापती





