Pune District : वडाची रस्त्यावर गर्द सावली निमसाखर परिसरातच

इंदापूर : तालुक्यातील 54 फाटा ते निमसाखर या हद्दीपर्यंत असणार्या राज्यमार्गावर मागील 50 ते 60 वर्षांपूर्वी पाटबंधारे विभागाने तसेच संबंधित विभागाने वडांच्या झाडांचे रोपण केले होते. हे वडवृक्ष परिपक्व झाले असून, रस्त्यावरील प्रवाशांना उन्हाळ्यात सावलीचा थंडावा देत आहेत. अशी रस्त्यावर सावली फक्त तालुक्यात निमसाखर परिसरातच दिसत आहे. इतर रस्त्यावर सावली देणारी झाडे नसल्यामुळे उन्हाच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
54 फाटा ते निमसाखर येणारा पाटबंधारे विभागाच्या कालव्यालगत राज्यमार्ग आहे. पूर्वी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांवर 22 गावातील दिवंगत नेते जलतज्ञ सूर्यकांत आप्पा पाटील, तसेच दिवंगत नेते पंचायत समितीचे माजी सभापती विश्वासराव रणसिंग यांचे शेतकर्यांच्या पाण्यासंदर्भात, रस्त्या संदर्भात बारीक लक्ष असायचे. त्यामुळे आज जे वड या रस्त्यावर डौलाने उभे आहेत. यामागे या दिवंगत नेत्यांचा एक आदरयुक्त दरारा देखील आजही प्रवाशांना सावली देणारा ठरत आहे. याच रस्त्यावरील काही शेतकर्यांनी मागील काही वर्षात काही वडांची गैरमार्गाने तोड केली. काही वड पेटवले गेले.
यासंदर्भात देखील दिवंगत नेते रवींद्रबापू रणवरे पाटील यांनी शासन दरबारी आवाज उठवला होता. त्यामुळे वड तोडण्याच्या जाळण्याच्या पद्धतीला आळा बसला. सामाजिक जाण असणारा हा परिसर असल्यामुळे या रस्त्याच्या कडेच्या वटवृक्ष झाले आहेत.
निधी मातीमोल जाऊ नये
प्रवाशांना सावली देणारी झाडे व निसर्गाचा समतोल राखण्यासाठी तालुक्यातील कोट्यवधी रकमेचा निधी खर्चून नव्या होत असणार्या रस्त्याच्या कडेला वृक्ष लागवड यशस्वी करावी. संबंधित गावाने या वृक्ष लागवडीची जबाबदारी घ्यावी. सार्वजनिक बांधकाम विभागाने व गावकर्यांनी सामूहिक पद्धतीने वृक्ष लागवड, प्रत्येक रस्त्यावर करावी, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिक करत आहेत. तालुका लागवड कार्यालयातून वृक्ष लागवड केली जाते; मात्र यातील किती झाडे जगली, किती झाडे गेली याचा विचार वरिष्ठ शासन स्तरावरून होत नाही. इंदापूर तालुक्यातील वन लागवड विभागाला येणार्या निधी मोठ्या प्रमाणात मातीमोल जात आहे.





