पुणे जिल्हा : सोमेश्वरनगर भागात बंधारे पुन्हा पाण्याखाली

सोमेश्वरनगर : नीरा खोऱ्यातील धरण क्षेत्रामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रातील चारही धरणे भाडगर, नीरा देवघर, गुंजवणी आणि वीर. शंभर टक्के भरली आहेत.
वीर धरणातून नीरा नदीतील विसर्गाने सोमेश्वरनगर भागातील बंधारे दुसऱ्यांदा पाण्याखाली गेली आहेत. निंबूत, होळ, मुरूम हे बंधारे पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहेत. होळ येथील बंधाऱ्यावरून पाणी गेल्याने बारामती व पुरंदर तालुक्याचा संपर्क तुटला आहे.
नीरा नदीला दुसऱ्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणात सोडलेल्या विसर्गाने अनेक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी जाऊन नुकसान झाले आहे. अनेकांची उभी पिके पाण्यामध्ये वाहून गेले आहेत. उसासारखी उभी पिके जमीनदोस्त झालेली आपणास दिसत आहेत.
एवढ्या मोठ्या प्रमाणात सोडलेल्या विसर्गामुळे आता मात्र नदीकाठचा शेतकरी धास्तावलेला दिसला आहे. निंबूत, होळ, मुरूम येथील बंधारे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. नीरा खोऱ्यातील चारही धरणे फुल्ल झाल्याने नीरा नदीमधील सोडलेल्या विसर्गामध्ये वाढ देखील होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा पाटबंधारे विभागाच्या वतीने दिला आहे.





