Pune District: भोर तालुक्यात १३०.६८ हेक्टरवरील पिके, फळबागांचे नुकसान

भोर : भोर तालुक्यात मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी बागायती पिकांचे सुमारे १३०.६८ हेक्टर क्षेत्रावर नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांना शासनाच्या आदेशानुसार २१ लाखापर्यंत नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती भोर तालुका कृषी अधिकारी शरद धर्माधिकारी यांनी दिली.
भोर तालुक्यात ७ मे ते २९ मेपर्यंत अवकाळी पाऊस सरासरीच्या ९०० टक्के झाल्याने शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. काढणी योग्य भुईमूग, सोयाबीन, बाजरी, कांदा ही पिके पावसात भिजून,शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शेतकऱ्याचे वर्षभराचे मिळणारे बाजरी, शेंगदाणा तेल, जनावरांना मिळणारी पेंड, भुईमुगाचे टाळे (काड) यांचा फटका शेतकऱ्यांना मोठा बसला आहे. यामुळे शेतकऱ्याचे वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
४६ गावातील ३५२ शेतकऱ्यांचे नुकसान
भोर तालुक्यातील ४६ गावातील ३५२ शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यात भात – ०.२० गुंठे, सोयबिन – २०.७३ हेक्टरी , भूईमुग – ५७. ८४ हेक्टरी , बाजरी – ९.०५ हेक्टरी , ज्वारी – १.९७ हेक्टरी, इतर – ३.२० हेक्टरी नुकसान झाले असून २३ गावातून १०९ शेतकऱ्याचे भाजीपाला – २४.०७ हेक्टरी , फूले – ०.१५ हेक्टरी एवढे नुकसान झाले असून फळामध्ये ११ गावातून ३८ बाधित शेतकऱ्याचे फळामधील आंबा – १३.४७ हेक्टरी नुकसान झाले असून एकूण ३३ टक्केवर फळपिके सोडून जिरायतबाधित क्षेत्र ९२.९९ हेक्टरी, बागायत बाधित क्षेत्र २४.२२ हेक्टरी, फळपिकाखालील बांधित क्षेत्र १३.४७ हेक्टरी, असे तालुकयात एकूण ४९९ शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.
मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे उन्हाळी बागायती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. महसूल विभागाचे ग्रामविकास अधिकारी, ग्राममहसूल अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या पिकांचा पंचनामा करुन शासनाकडे त्यांचा अहवाल पाठविला आहे. शासनाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार आहे.
– राजेंद्र नजन, तहसीलदार भोर





