पुणे जिल्हा : माकडांच्या हल्ल्यात घरांसह शेतीचे नुकसान

रायरतील ग्रामस्थ धास्तावले ः वन विभागाकडे नुकसानभरपाईची मागणी
भोर – भोर तालुक्यतील रायरेश्वर किल्याच्या पायथ्याला असलेल्या रायरी गांवात रानटी माकडांनी हैदोस घातला असून सुमारे 40 ते 50 माकडांचे टोळक्याने भातखाचरातील फुलोऱ्यावर आलेल्या भात, नाचणी, भुईमुग आदी पिकांसह आंबा, फणस व इतर झाडांची नासधून केली असून घरांवरील कौले, पत्रे, खिडक्या, दरवाजांचे नुकसान केले आहे. या हल्ल्यामुळे येथील ग्रामस्थ धास्तावले आहेत. या जंगली माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी ग्रामस्थांनी भोरच्या वन विभागाकडे केली आहे.
रायरेश्वर किल्ल्याचे पायथ्याला असलेल्या रायरी गावठाण, फणसवाडी, रेणुसेवाडी, धारांबेवाडी येथे गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून 10 ते 15 माकडांच्या दोन-तीन टोळक्यांत असलेल्या सुमारे 50 माकडे असून, ती गावात आली आहेत. भात पिकाच्या ओंब्या ओरबाडणे, भुईमुगाचे डहाळे उपटणे, नाचणी, वरई पिकाची नासाडी करणे, आंबा, फणस आणि इतर महत्त्वाच्या फळझाडांच्या फांद्या तोडणे,
घरांवर चढून कौले फोडणे, पत्रे चेंबवणे, खिडक्या-दरवाजावर दगडी मारणे, घरात शिरून कांदे, बटाटे व खाद्य पर्दाथ पळवणे, विरोध केल्यास ग्रामस्थांच्या अंगावर धावुन जाणे असा प्रकार गेल्या 10 ते 15 दिवसापासून सुरू आहे, यामुळे नागरिकांत भीतीचे वातावराण असून घराबाहेर पडण्यास किंवा शेतात जाण्यास लोक घाबरत आहेत.
वनविभागाने या माकडांचा बंदोबस्त करून लोकांना नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. या पूर्वी कधीही असा प्रकार घडला नसल्याचे माजी सरपंच सूर्यकांत किंद्रे यांनी सांगीतले.





