Pune District : युवा पिढीसाठी सायकल स्पर्धा महत्वपूर्ण

मंत्री मकरंद पाटील : सायकल स्पर्धेत घाटाचा राजा राजस्थानचा सारडा
बारामती – उद्याच्या भारताचे आधारस्तंभ असलेल्या युवा पिढीच्या उत्तम आरोग्यासह शारीरिक, मानसिक तंदुरुस्तीच्या माध्यमातून सर्वांगीण विकास आणि पर्यावरणाच्या रक्षणाच्यादृष्टीने सायकल स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले.
गदिमा सभागृहात पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली व सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुणे ते बारामती दरम्यान आयोजित राष्ट्रीय सायकल स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजयसिंह देशमुख, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजीव सोनवणे, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मनोहर चासकर, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे महासचिव मनिंदर सिंह, सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे पदाधिकारी उपस्थित होते.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वाटचालीचे कौतुक करून पाटील म्हणाले, पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया नवी दिल्ली व सायकल असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने पुणे ते बारामती दरम्यान आयोजित राष्ट्रीय सायकल स्पर्धेत राष्ट्रीयस्तरावरील ५०० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला.
मानद सचिव ॲड. संदीप कदम यांनी प्रास्ताविक केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. याप्रसंगी श्री छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, माळेगाव कारखान्याच्या उपाध्यक्ष संगीता कोकरे, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक संभाजी होळकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, खेळाडू, शिक्षक उपस्थित होते.
स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे (कंसात किमी. व वेळ) :
घाटाचा राजा (दिवे घाट) – राष्ट्रीय स्पर्धा – मानव सारडा, राजस्थान (००.०८.०६). घाटाचा राजा (दिवे घाट) – राज्य स्पर्धा – सिद्धेश अजित पाटील, कोल्हापूर (००.०८.३२), पुणे ते बारामती पुरुषांसाठी राष्ट्रीयस्तर (१२२ किमी) : प्रथम क्रमांक – दिनेश कुमार, एअर फोर्स (२.२९.५४) (‘कर्तृत्वाचा वारसा, नव्या पिढीस दिशा’ स्व. प्रताप शंकर जाधव चषक), द्वितीय – सूर्या रमेश थाथू, महाराष्ट्र (२.३१.३३), तृतीय – उदय गुलेड, कर्नाटक (२.३५.५८) याने पटकावला. पुणे ते बारामती पुरुषांसाठी राज्यस्तर – (१२२ किमी) : प्रथम – तांबोळी अमन राजअहमद, सांगली (२.३६.२०), द्वितीय – नदाफ निहाल मुसा, सांगली (२.३७.४९), तृतीय – चोपडे हनुमान यशवंत, बीड (२.४०.२७) याने मिळवला.
सासवड ते बारामती MTB सायकल खुली स्पर्धा पुरुषांसाठी राज्यस्तर (८५ कि.मी.) : प्रथम – शेख खुददुस, पुणे (२.०३.५९), द्वितीय – योगेश सोनवणे, नाशिक (२.१०.२६),तृतीय – आर्यन मरळ, पुणे (२.१०.३३). माळेगाव ते बारामती महिलांसाठी राष्ट्रीयस्तर (१५ कि.मी): प्रथम क्रमांक – गंगा दांडीन, कर्नाटक (२२.२६.७४), द्वितीय- पूजा दानोले, महाराष्ट्र (२२.२६.७५), तृतीय – श्रावणी परीट, (२२.२६.७६). सासवड ते बारामती (पोलीस/ राज्य कर्मचारी) राज्यस्तरीय (८५ किमी) : प्रथम -शिवम खरात, संभाजीनगर (२.१०.२०) द्वितीय- अमोल क्षीरसागर, सांगली (२.३०.०२) तृतीय – प्रसाद आलेकर, रत्नागिरी (२.३१.१२) याने प्राप्त केला. माळेगाव ते बारामती (राज्य पोलीस/राज्य कर्मचारी महिला राज्यस्तरीय (१५ किमी) : प्रथम- सिद्धी मनोहर वाफेलकर (००.२४.१०), द्वितीय – रूपाली गिरमकर (००.२४.१०) यांनी पटकवला.





