पुणे जिल्हा : पाण्यासाठी आरपारची लढाई आक्रमकतेकडे

बारा गावांतील शेतकरी एकाच छताखाली; भविष्यात नेत्यांना गावबंदी
राजेंद्र वारघडे
पाबळ – शिरूर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील बारा गावांनी आता फक्त पाणी आणायचे आणि ते मिळवायचेच’ असा एल्गार करून आंदोलनाला तोंड फोडले आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींना बाजूला ठेवून मुख्यमंत्री अथवा प्रशासनाशी संघर्ष करायचा, अशी आक्रमक भूमिका ठेवून आढावा बैठकीतून रणशिंग फुंकले आहे. त्यामुळे भविष्यात बारा गावांचे पाणी चांगलेच पेटणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
वास्तविक बैठकीला सर्वच राजकीय पक्षांचे पहिल्या फळीतील कार्यकर्ते तसेच पदाधिकारी उपस्थित होते. तरीही बैठकीच्या सुरुवातीला राजकीय संबंध बाजूला ठेवून आंदोलनात सहकार्य करण्याची भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले. त्यात लोकप्रतिनिधींना गावबंदी करण्याचे आवाहन करण्यात आले. यामागे गेल्या पंचवीस वर्षांची शोकांतिका असल्याची बाब स्पष्ट झाली आहे.
बारा गावांना गेल्या 25 वर्षांत चासकमानचे पाणी मिळाले नाही. डिंभे धरणाचे पाणी मिळाले नाही. त्यात भरीत भर म्हणून कळमोडी धरणाचे पाणी मिळू शकले नाही. यामागे केवळ सोयीस्कर राजकारणासाठीच कार्यकर्त्यांचा व गावांचा वापर झाल्याची भावना आढावा बैठकीतून उमटल्या आहेत. या खंत आणि भळभळत्या जखमेंवर फुंकर घातल्यानंतर उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला आहे. त्यामुळेच कदाचित हे आंदोलन आता थांबणार नसल्याचे सूचित झाले आहे.
कान्हूरचे माजी सरपंच दादा खर्डे यांनी वस्तुस्थिती पुढे मांडली. पंधरा वर्षांपूर्वी आंबेगाव तालुक्याला ही गावे जोडली गेली तर आंबेगावमध्ये डिंभे धरण तर शिरूरमध्ये चासकमान धरणाचे पाणी वाहत असताना मतदानासाठी आंबेगावला आणि महसुलासाठी शिरूरला याच दुहीमुळेच तीन धरणांचे पाणी मिळाले नाही. वास्तविक पंधरा वर्षांपूर्वी आमची गावे मतदानासाठीच केवळ जोडली गेली नसती तर कदाचित यापूर्वीच पाणी मिळाले असते, अशी खंत व्यक्त केली. त्याचवेळी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना आज राजकारणात जे विरोधी होते. ते सत्तेत एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. एकमेकांच्या ताटात जेवत आहेत.
आता सर्व राजकीय नेत्यांनी एकत्र येऊन आम्हाला पाणी द्यावे, ही आमची अपेक्षा आहे. त्यासाठी आंदोलन आहे, असे संकेत दिले आहे. आम्ही पाणी मिळवणारच हा आमचा निश्चय ठाम आहे ही भूमिका मांडली. ही वस्तुस्थिती फसर्वच मतदारांना कळून चुकली असल्याने आंदोलनाची धग वाढणार आहे. सध्या राजकीय कार्यकर्त्यांनाच चटका लावून गेल्यामुळे आंदोलनात सर्वपक्षीय कार्यकर्ते एकत्र आले आहेत.
तळ्यात-मळ्यातील नेत्यांची गोची
पाबळचे विद्यमान सरपंच सचिन वाबळे व माजी सरपंच सोपान जाधव म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादी असो, कोणत्याही कार्यकर्त्याने नेत्यांजवळ दिसायचे नाही. या नेत्यांना गावबंदी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे तळ्यात मळ्यात भूमिका घेणारे राजकीय पक्षीय कार्यकर्ते तसेच राजकीय नेते यांच्यासाठी आता मतदार योग्य भूमिका घेतील, अशी अशी चर्चा आढावा बैठकीनंतर शेतकऱ्यांमध्ये होती.





