पुणे जिल्हा : मुसळधार पावसाने पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांना धोका

मंचर – पिंपळगाव खडकी (ता. आंबेगाव) परिसरात मुसळधार पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांना धोका होण्याची शक्यता सोमवार, दि.२१ रोजी निर्माण झाली आहे. झालेला पाऊस ऊस पिकाला चांगला तर तरकारी पिकाला मारक ठरण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात पावसाने हुलकावणी दिली होती.
गेल्या आठवड्याभरात तुरळक पाऊस पडत होता. परंतु सोमवारी दुपारी सुमारे एक तासभर मुसळधार पाऊस पडल्याने पिंपळगाव परिसरात रस्ते जलमय झाले होते. तसेच तरकारी असणाऱ्या फ्लावर, कोबी, मिरची, वांगी, बीट इत्यादी पिकांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे तरकारी पिकांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
विशेषतः ऊस पिकासाठी पाऊस उपयुक्त असला तरी पिंपळगाव परिसरात तरकारी पीक जास्त आहे. त्यामुळे जास्त झालेला तरकारी पिकाला मारक ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मंचर-पिंपळगाव मार्गे निरगुडसर दरम्यान गव्हाळीमळा येथे सुमारे एक ते दीड फूट रस्त्यावरून पाणी वाहत होते. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पाऊस उघडल्यानंतर हळूहळू रस्त्यावरील पाणी कमी झाल्याने वाहतूक पूर्ववत झाल्याचे वाहन चालकांनी सांगितले.





