पुणे जिल्हा : परतीचा पावसामुळे सोयाबीनवर संकट

उभे पीक सडलंय तर गंजी भिजल्याने बळीराजा चिंतातूर
ओतूर – गेल्या काही दिवसांपासून परतीच्या सुरू असलेल्या परतीच्या पावसाने शेतमालाले मोठे नुकसान झाले असून कापणीला आलेली आणि कापणी केलेली पिके पावसामुळे सडायला लागली आहेत. या पावसामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला आहे.
काही शेतकर्यांनी पीक काढून शेतात गंजी लावली. पण काही दिवसांपासून पुन्हा सुरू झालेल्या परतीच्या पावसाने शेतमाल ओला झाला. पावसामुळे सोयाबीन काळे पडत असल्याचे शेतकरी सांगतात.तर झाडाला असलेली 40 टक्क्यांपेक्षा अधिक सोयाबीन खराब झाली आहे. त्यात आणखी काही दिवस सोयाबीन शेतात राहिलं तर शेतमालाची प्रतवारी खराब होऊन भाव मिळत नाही, असे बळीराजाचे म्हणणे आहे. सध्या ओल्या सोयाबीनचे दर 2500 ते 3000 तर सुकलेल्या सोयाबीनचे दर 4000 ते 4200 प्रतिक्विंटल आहे.
तर सोयाबीन फेकण्याशिवाय पर्याय नाही
सोयाबीनचे भाव हे गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी आहे आणि असाच पाऊस असला तर सोयाबीन फेकण्याशिवाय पर्याय राहणार नाही, एकीकडे सोयाबीनचे झालेले नुकसान आणि दुसरीकडे काढणी झालेल्या सोयाबीन उघड्या डोळ्याने खराब होताना पाहणे हे बळीराजासाठी प्रचंड वेदनादायी आहे.
या परिसरातील उत्पादक हतबल
सोयाबीन पिकाचे आगार समजले जाणार्या माळशेज परिसरामध्ये डिंगोरे, पिंपळगाव जोगा, पाचघर, उदापूर, अहिनवेवाडी, आंबेगव्हाण, रोहोकडी, ओतूर, धोलवड परिसरामध्ये उत्पन्न घटल्याने सोयाबीन उत्पादक बळीराजा हतबल झाला आहे.





