Pune District : अल्पवयीन विद्यार्थिनीचा पाठलाग करणाऱ्यावर गुन्हा

दौंड : सध्या सर्वत्र दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा सुरू आहे. त्यामुळे पेपर झाल्यानंतर परीक्षा केंद्राबाहेर रोडरोमिओंनी धुमाकूळ घातला आहे. शहरातील एका परीक्षा केंद्राबाहेर अल्पवयीन विद्यार्थिनीला छेडछाड करून वारंवार तिचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास दिल्याची तसेच एवढ्यावरच न थांबता रोड रोमिओनी तिच्या वडिलांना मारण्याची धमकी दिली असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दौंड पोलिसांनी दोघा युवकांविरोधात गुन्हा दाखल करून मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
याप्रकरणी विद्यार्थिनीच्या आईने फिर्याद दिली, दौंड पोलिसांनी अरबाज हुसेन शेख(रा. कस्तान चाळ, दौंड) व अनोळखी साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना (दि.27) फेब्रुवारी रोजी दुपारच्या दरम्यान घडली. (दि.27) फेब्रुवारी रोजी पेपर झाल्यानंतर विद्यार्थिनी भेदरलेल्या अवस्थेत रडतच घरी गेली.
आईने तिची विचारपूस केली असता तिने सांगितले की, पेपर सुटल्यानंतर ती घरी येताना आरोपी अरबाजने दुचाकीवरून तिचा पाठलाग केला. तिच्या अंगाजवळून दुचाकी नेत तिला कट मारला. ती घराजवळ आली असता अरबाज याने तिला फोन कर, असा इशारा करून निघून गेला. घरचे आपली शाळा बंद करतील या भीतीने ती गप्प होती. मात्र, आज त्रास असह्य झाल्याने तिने आईला हा प्रकार सांगितला.
(दि.28) रोजी विद्यार्थिनी व आई दोघेच घरी असताना अरबाज पुन्हा त्यांच्या घरासमोर आला. सिगारेट ओढत वाईट नजरेने मुलीकडे पहात उभा राहिला. त्यामुळे दोघेही घरात निघून गेल्या. त्यांनी हा प्रकार सुद्धा आपल्या वडिलांना सांगितला. तरीही सगळे शांतच राहिले. (दि.1) मार्च रोजी सकाळी पोस्ट ऑफिस परिसरात अरबाज दुचाकीवर साथीदारासोबत आला. त्यांनी मुलीच्या वडिलांना शिवीगाळ केली. अरबाज याच्याकडून कुटुंबाला होणारा त्रास असह्य झाल्याने त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत आहेत.





