Pune District: पाटसच्या सरपंचांसह १९ जणांवर गुन्हा

पाटस : दौंड तालुक्यातील पाटस येथील विद्यमान सरपंच तृप्ती भंडलकर व त्यांचे पती दादा भंडलकर यांच्यासह १९ आरोपींवर जातीवाचक शिवीगाळ, बेकायदा जमाव जमवून दुकान उद्ध्वस्त करून साहित्य व रोख रक्कमेसह ४ लाख ९७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल घेऊन गेल्याप्रकरणी यवत पोलिसांत ॲट्रॉसिटीसह गंभीर गुन्हे दाखल केले.
(दि.११) फेब्रुवारी रोजी सरपंच व त्यांचे पती आणि एका व्यक्तीचे भांडण झाल्याने पाटस गाव बंद ठेवण्यात येणार असल्याचा संदेश प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित झाला होता. घटनेचे वार्तांकन करण्यासाठी राजेंद्र झेंडे हे पाटस येथील महाराष्ट्र बँकेसमोर गेले होते. त्यावेळी सरपंच यांचे पती भंडलकर व संभाजी चव्हाण हे फिर्यादी यांच्याजवळ येऊन बातम्या करून गावाची बदनामी करीत आहे, असे म्हणून जातीचा उल्लेख करत सार्वजनिक ठिकाणी जातीवाचक शिवीगाळ केली. सरपंच यांचे पती दादा भंडलकर याने फिर्यादी यांची टपरी काढून फेकून देतो. तसेच घरावर हल्ला करून कुटुंबाला जीवे मारतो, अशी धमकी देतो.
दुसऱ्या दिवशी (दि.१२) फेब्रुवारी रोजी फिर्यादी यांचे दुकानाचे कुलुप तोडून, तोडफोड करून लोखंडी पत्र्याची टपरी उद्ध्वस्त करीत सर्व वस्तू जप्त केल्या. याप्रकरणी दादा जनार्दन भंडलकर, विद्यमान सरपंच तृप्ती भंडलकर, संभाजी उर्फ बाळू चव्हाण, दिगंबर उर्फ सुनील शितोळे, स्वप्नील निंबाळकर, झहीर शेख (सर्व रा.पाटस) इतर १० ते १५ अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास दौंडचे उपविभागीय पोलिस अधिकारी बापुराव दडस हे करीत आहेत.





