पुणे जिल्हा : आंबेगाव तालुक्यात गव्यांचा धुमाकूळ

भातशेतीचे नुकसान ः वन खात्यासमोर आव्हान
रांजणी – आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील खोऱ्यात गेल्या काही दिवसांपासून गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. या गव्यांचा कळप डोण गावच्या परिसरात स्थिरावला असून, त्यांनी भातशेतीचे अतोनात नुकसान केले आहे. गव्यांच्या वावरामुळे वन विभागासमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या गव्यांचा बंदोबस्त कसा करायचा? असा प्रश्न वन प्रशासनाला पडला आहे.
भीमाशंकरच्या पश्चिम आदिवासी भागात गेल्या काही दिवसांपासून गव्यांचे दर्शन शेतकऱ्यांना होत आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी केलेल्या भातशेतीच्या नुकसानीचे पंचनामे कृषी विभागाकडून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार यंदा डोण गावातील जवळपास 20 एकरपेक्षा जास्त भातक्षेत्र लागवडीपासून वंचित राहिले आहे. सुमारे साडेपाच लाख रुपये किमतीचे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. मात्र वन्यजीव विभागाला हे गवे सांभाळण्याची वेळ आली असून, त्यांना वारंवार मानवी वस्तीपासून दूर जंगलात हकलण्याचे काम वन विभागाला करावे लागले आहे. पश्चिम आदिवासी भागात गव्यांच्या बंदोबस्तासाठी वन्यजीव विभागाचे कर्मचारी भर पावसात जीव धोक्यात घालून गव्यांना दूर जंगलात हाकलण्याचे काम करीत आहेत.
दरम्यान भीमाशंकर अभयारण्यातील आहुपे खोऱ्यात दोन गावांच्या परिसरात 20 जुलैच्या दरम्यान प्रथम गव्यांचे दर्शन झाले होते. या गव्यांनी दोन गावांतील दहा आदिवासी शेतकऱ्यांच्या भात रोपवाटिकांचे नुकसान केले होते. या घटनेची माहिती मिळताच वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली होती.
शेतकऱ्यांनी नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली, त्यानुसार पंचनामे करण्यात आले. वन्यजीव विभागालाही आता जाग आल्याने त्यांनी शोध मोहीम सुरू करताच येथील सोमा गवारी यांच्या शेताजवळ गव्यांचा कळप आढळून आला. त्यामध्ये एक नर आणि दोन मादी आहेत. सध्या जंगलात मुबलक प्रमाणात मिळणाऱ्या चाऱ्यामुळे हे गवे येथेच स्थिरावले असून ते पाळीव जनावरांच्या कळपातही घुसत असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.





