पुणे जिल्हा : धर्मपरिवर्तन ही बाब हिंदु धर्माच्या दृष्टीने चिंतेची

– भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांचे प्रतिपादन
मंचर – आपण कुठल्या धर्माच्या पंथाच्या विरोधात नाही तर आपला धर्म संस्कृती जपण्यासाठी आपण काम करत आहे. ग्रामीण भागात गोरगरिबांना कशाचे तरी आमिष दाखवून धर्म परिवर्तन केले जात आहे. ही बाब हिंदू धर्माच्या दृष्टीने चिंतेची आहे. हिंदू धर्माच्या सर्व संघटनांनी एकत्र येणे काळाची गरज आहे, असे मत भाजप किसान मोर्चाचे माजी जिल्हाध्यक्ष संजय थोरात यांनी व्यक्त केले.
नाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर देशात व राज्यात सुरू असलेल्या ख्रिस्ती धर्मप्रसार व अवैध्य ख्रिस्ती धर्मांतरांच्या विरोधात मंचर (ता.आंबेगाव) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे हिंदुत्त्ववादी संघटनेच्या वतीने इस्कॉन, प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय, विश्व हिंदू परिषद, धर्म जागरण, बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.
यावेळी अक्षय जगदाळे, आश्विन बढे, सागर भोर, अक्षय चिखले, मयूर गायकवाड, चैतन्य महाराज, पार्थ चासकर, किशोर शिंदे, जयप्रकाश वळसे पाटील यांच्यासह हिंदुत्ववादी संघटनेचे विविध मान्यवर उपस्थित होते. बजरंग दलाचे संतोष खामकर म्हणाले की, जगात आपला हिंदू धर्म सर्वात मोठा धर्म असून आपला धर्म टिकवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरावे लागत आहे. ही खेदाची बाब असून शिक्षणाच्या नावाखाली अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना काही जातीधर्माचे गणवेष परिधान करून शाळेत बोलवले जाते. गोरगरिबांना आमिष दाखवून धर्म परिवर्तन केले जात आहे. अशा प्रकारे चुकीच्या पद्धतीने धर्म परिवर्तन केल्यास धर्म परिवर्तन करणाऱ्यांना चोप दिला जाईल. असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी इस्कॉनचे पूज्य नवद्वीप दास प्रभूजी म्हणाले की सनातन भागवत धर्माचा प्रचार पूर्ण जगभरात झाला पाहिजे. यासाठी आमच्या संघटनेमार्फत काम सुरू असून गेल्या काही वर्षात इतर धर्मीय पंथीय हे आपल्या हिंदू धर्मात आक्रमण करत असून पुन्हा एकदा आपल्या सनातन धर्माची जगभरात प्रसार करण्याची वेळ आली आहे. संतोष परदेशी, प्रशांतभाऊ काळे, अॅड. स्वप्ना खामकर-पिंगळे,जागृती महाजन यांनी धर्मांतराविषयी आपली भूमिका भाषणातून विषद केली. धर्म जागरणचे जिल्हा प्रशासकीय संपर्कप्रमुख जे. पी. वळसे पाटील यांनी आभार मानले.





