Pune District : संततधार पावसाने शिरदाळे परिसरात पिकांना दिलासा

बटाटा फुलोर्यात
लोणी धामणी – गेल्या पंधरा ते वीस दिवस पावसाने दडी मारल्यामुळे आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील शिरदाळे, धामणी, पहाडदरा परिसरातील शेतकरी थोडे चिंतेत सापडले होते. कारण मे, जून, जुलै या महिन्यात भरपूर पडलेला पाऊस ऑगस्ट महिन्यात गायब झाला होता. बटाटा, वाटाणा, मका, सोयाबीन तसेच इतर नगदी पिके धोक्यात आली होती. परंतु गेली तीन, चार दिवस सुरू असलेल्या संततधार पावसाने सर्व पिकांना जीवदान दिले आहे. त्यामुळे शेतकरी आनंदित झाला आहे.
बटाटा पीक देखील अंतिम टप्प्यात आले असून ऐन फळ लागण्याच्या काळात पावसाने उघडीप दिली होती. काही शेतकर्यांनी बटाट्याला पाणी भरण्यास सुरवात केली होती परंतु पावसाने पुन्हा दमदार पुनरागमन केल्याने शेतकरी आनंदित झाला आहे. तसेच शेतीवर अवलंबून असणारा दुग्ध व्यवसाय देखील शिरदाळे परिसरात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. सर्व जनावरे रानात चरण्यासाठी जात असतात; परंतु पावसाने बरेच दिवस उघडीप दिली होती त्यामुळे चारा देखील वाळला होता पण आता या पावसाने चारा देखील चांगला होणार आहे परिणामी दुधात देखील वाढ होणार असल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
यंदा सुरवातीपासूनच पावसाने चांगली सुरवात केली आहे. मध्यंतरी भरपूर झालेला पाऊस यामुळे पाणवठे देखील चांगल्या प्रमाणात भरलेले आहेत. सर्व पिके आता अंतिम टप्प्यात असून वेळेवरती झालेल्या पावसामुळे सर्वच पिकांना याचा फायदा होणार आहे. शिवाय आगात बटाटा लागवड झालेले बटाटे आता अंतिम टप्प्यात आहेत त्यामुळे त्यासाठी हा पाऊस जास्त पोषक असून याच पावसावर आता पीक निघणार असल्याचे बटाटा उत्पादक शेतकर्यांनी सांगण्यात आले
शिरदाळे परिसरातील शेती ही कोरडवाहू शेती आहे कधी जास्त पाऊस तर कधी कमी पाऊस यामुळे शेतकरी कायमच अडचणीत असतो. गेल्या काही दिवसांपासून दुग्ध व्यवसाय बर्यापैकी वाढलेला पाहायला मिळत असून त्याचा चांगला फायदा शेतकर्यांना होणार आहे.
लवकरच अभ्यास दौरा
नुकतेच एका कार्यक्रमामध्ये माजी खासदार शिवाजी आढळराव, जि. प. चे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भाजप नेते जयसिंग एरंडे यांनी शिरदाळे येथे शेततळे उभारण्यासाठी पुढाकार घ्यावा आणि शासनाचे अनुदान घ्यावे, असे आवाहन केले होते. त्यासाठी जालना जिल्ह्यातील काही गावांना आपण भेटी देऊन त्यावर अभ्यास करू असे देखील सांगितले होते. त्यावर ग्रामस्थांनी सकारात्मकता दर्शवली असून शिरदाळे गावातील मंडळींच्या सहकार्याने एक अभ्यास दौरा काढण्यात येणार असल्याचे सरपंच सुप्रिया तांबे, माजी उपसरपंच मयुर सरडे यांनी सांगितले.





