पुणे जिल्हा : संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी स्मारकस्थळे उभारणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : तुळापूर येथे बलिदान स्थळ विकासकामाचे भूमिपूजन
लोणीकंद – स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे वढू बुद्रुक येथील समाधी स्थळ व तुळापूर येथील बलिदान स्थळ ही पावन तीर्थक्षेत्रे आहेम. अनेक पिढ्यांना त्यांची कीर्ती, शौर्य, पराक्रम यांची प्रेरणा आणि ऊर्जा देणारी ठरावीत यासाठी ही दोन्ही स्मारकस्थळे छत्रपती संभाजी महाराजांच्या लौकिकाला साजेशी असावीत, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
तुळापूर येथे स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ विकास भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ. अमोल कोल्हे, पुणे म्हाडाचे अध्यक्ष शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार सर्वश्री राहुल कुल, महेश लांडगे, अशोक पवार, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल,
विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, जिल्हा बँक संचालक प्रदीप कंद, क्रीडा आघाडी अध्यक्ष संदीप भोंडवे, वढूच्या सरपंच अंजली शिवले, तुळापूरच्या सरपंच गुंफा इंगळे, उपसरपंच जयश्री शिवले, माजी उपसरपंच राजाराम शिवले, नवनाथ शिवले, पवन खैरे, ग्रामपंचायत सदस्य वर्षा शिवले, माजी उपसरपंच सुरेखा शिवले, सुवर्णा शिवले, सुवर्णा राऊत, अर्चना पुजारी आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती संभाजी महाराजांनी मोगल, सिद्धी, पोर्तुगीज अशा अनेक परकीय सत्तांशी अखंड संघर्ष केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या स्वराज्याच्या पायाभरणीवर छत्रपती संभाजी महाराजांनी कळस चढविला. मराठा साम्राज्यापेक्षा 15 पट मोठे असणार्या मोगल साम्राज्याला छत्रपती संभाजी महाराजांनी जेरीस आणले. त्यांनी अनेक लढाया केल्या. संपूर्ण जीवनात ते एकही लढाई हरले नाहीत.
गुलामीची बंधने झुगारून परकीय आक्रमणाला कणखर उत्तर देणारे धर्माभिमानी छत्रपती संभाजी महाराज यांच्यासारखा राजा होणे नाही, असे सांगून त्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या या भूमीत विकास कामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली.
राज्य शासन छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या आदर्शावर महाराष्ट्राची प्रगती, विकास आणि राज्यकारभार करीत आहे. सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचे कार्य, त्यांच्या जीवनात बदल घडविण्याचे कार्य, बळीराजाच्या पाठीशी ठाम राहण्याचे कार्य आज महाराष्ट्र शासन करत आहे.
-एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री





