पुणे जिल्हा : उरुळी कांचन येथे स्वच्छता अभियानात जिल्हाधिकार्यांचा सहभाग

उरुळी कांचन : नागरिकांनी स्वच्छतेची कर्तव्यता पार पाडली तर स्वच्छतेच्या प्रश्नावर आपण मात करू शकतो. शासन स्वच्छतेच्याबाबत मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करुन देत आहे. कचरा कमी कसा होईल, याच्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून 2 ऑक्टोबर हा दिवस ‘स्वच्छ भारत दिवस’म्हणून साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने उरुळी कांचन (ता. हवेली) येथे‘स्वच्छता ही सेवा’ मोहीम 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या अभियानाचा प्रारंभ उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील निसर्ग आश्रम येथे बुधवारी (दि. 18) पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते स्वच्छता अभियात सहभाग घेऊन करण्यात आला. यावेळी दिवसे बोलत होते.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, हवेलीचे गट विकास अधिकारी भूषण जोशी, उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे निरीक्षक शंकर पाटील, सरपंच अमित (बाबा) कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, भाऊसाहेब कांचन, राजेंद्र कांचन, उपसरपंच सीमा कांचन, जिल्हा नियोजन समिती सदस्य अलंकार कांचन, माजी उपसभापती हेमलता बडेकर, युवा नेते अजिंक्य कांचन, सदस्य शंकर बडेकर, सुनील तांबे, ग्रामविकास अधिकारी प्रकाश गळवे, भाऊसाहेब तुपे, ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्यने उपस्थित होते.
माजी सरपंच संतोष कांचन यांनी प्रास्ताविकात उरुळी कांचन व परिसरात कचर्याचा प्रश्न मोठा आहे. यासाठी उरुळी कांचनला कचरा विघटनासाठी चांगल्या प्रतीच्या प्लांटची मागणी केली होती. कार्यक्रमात जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते उरुळी कांचन शहरात ग्रामस्वच्छतेचे कार्य करणार्या उरुळी कांचन ग्रामस्वच्छता अभियान ग्रुपचे संतोष चौधरी यांचा जिल्हाधिकारी दिवसे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
भविष्यातील कचरा विघटनासाठी चांगल्या प्रतीचा प्लँट बसविण्यात येणार आहे. तसेच ओढ्यावरील पाणी शुद्धीकरण करण्यासाठी प्लँट इंस्टाल करण्यात येईल. कचर्याचे पर्यावरणाच्या दृष्टीने योग्य व्यवस्थापन करण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत उरुळी कांचन येथे प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प लवकरच उभारण्यात येईल.
-संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे





