पुणे जिल्हा : जिल्हाधिकाऱ्यांनी विद्या भापकर यांचा अर्ज फेटाळला

मोरगाव : तरडोली ता. बारामती ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंच विद्या भापकर यांच्या विरुद्ध डिसेंबर २०२३ मध्ये अविश्वास ठराव मंजुर झाला होता. या ठरावाविरोधात भापकर यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे अपिल केले होते. या अपीलावर निर्णय देताना अविश्वास ठरावाची सभा नियमानुसार झाली असून बहुमताने अविश्वास ठराव करण्यात आला आहे असे कारण देत जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी विद्या भापकर यांचे अपील फेटाळले आहे. यामुळे गेल्या सहा महीन्यापासून रखडलेल्या सरपंच निवडीचा मार्ग सुकर झाला आहे.
बारामती तालुक्यातील तरडोली येथील विद्यमान सरपंच विद्या भापकर यांविरोधात १५ डिसेंबर २०२३ रोजी अविश्वास ठराव मंजूर झाला होता. या अविश्वास ठरावाच्या बाजूने महेंद्र जिजाबा तांबे, सागर पंडीत जाधव, नवनाथ जयसिंग जगदाळे, अश्विनी श्रीकांत गाडे, स्वाती सतीश गायकवाड, अनिता उत्तम पवार, नबाबाई सोमनाथ धायगुडे यांनी तर विरोधात विद्या हनुमंत भापकर, संतोष संपत चौधरी यांनी मतदान केल्याने हा ठराव सात विरूध्द दोन ने मंजुर झाला.
याविरोधात न्याय मागण्यासाठी भापकर यांनी पुणे जिल्हाधीकारी यांकडे अपील केले होते. अविश्वासा विरोधात दाखल केलेल्या अपिलावर निकाल देताना जिल्ह्याधीकाऱ्यांनी ठरावाची नोटीस कायदेशीर तरतुदीनुसार देण्यात आल्याचे दिसून येते. तसेच अविश्वास ठराव ३/४ पेक्षा कमी नाही इतक्या बहुमताने मंजूर केलेला आहे. ठरावाच्या बाजूने उपस्थित ९ सदस्यांपैकी ७ सदस्यांनी मतदान केलेले आहे. या सर्व बाबींचा विचार करून अर्जदार यांचा अर्ज फेटाळण्यास पात्र आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. यासंदर्भात तरडोलीच्या तत्कालीन सरपंच विद्या भापकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, हा निकाल मान्य नसुन या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील दाखल केले आहे.
या निकालाबाबत अविश्वास दाखल करणारे उपसरपंच सागर जाधव व सदस्य नवनाथ जगदाळे यांनी बोलताना सांगितले की, मा. सरपंच विद्या हनुमंत भापकर यांनी गावांमधील 15 वित्त आयोगातून केलेल्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला व त्यांच्या पतीचा ग्रामपंचायत कारभारामध्ये व व्यवहारांमध्ये वारंवार हस्तक्षेप असल्यामुळे आम्ही बारामती पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती त्या तक्रारीमध्ये ग्रामपंचायत कारभार तपास होऊन त्यांच्यावरती वसुलीची कारवाईचे आदेश पंचायत समिती बारामती गट विकास अधिकारी यांनी अहवाल दिलेला आहे. त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास दाखल केला होता. अखेर सत्याचा विजय झाला आहे.





