Pune District : स्वच्छ भवानीनगरची सुरुवात ‘श्री छत्रपती’ कारखान्यातून!

अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली कारखाना व परिसर स्वच्छतेकडे वाटचाल
भवानीनगर – श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी आपल्या कार्यशैलीचा ठसा उमटवत कारखाना परिसरातील स्वच्छता मोहिमेला सुरुवात केली आहे. आजवर दुर्लक्षित राहिलेल्या अनेक भागांमध्ये सफाई मोहीम राबवून कारखाना व परिसर स्वच्छ व सुशोभित करण्यात आला आहे.
कारखान्याच्या व्यापारी पेठेपासून कामगार वसाहतीपर्यंत सर्व ठिकाणी कचर्याची विल्हेवाट लावण्याची नवीन व्यवस्था तयार करण्यात आली असून, यामुळे भवानीनगर परिसर कचरामुक्त व स्वच्छ दिसू लागला आहे. कारभार हाती घेताच अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी सर्व विभागांची माहिती घेतली आणि प्राथमिक टप्प्यात स्वच्छतेवर भर दिला.
यासाठी व्यापारी पेठ व कामगार कॉलनीत जागोजागी पत्र्याच्या कचराकुंड्या बसवण्यात आल्या असून, त्या कचराकुंड्यांतील साठवलेला कचरा आठवड्यातून एकदा कारखान्याच्या ट्रॅक्टरद्वारे उचलला जातो. त्याचबरोबर रस्ते झाडणे, कचरा उचलणे व नियमित देखभाल यामुळे संपूर्ण परिसरात एक नवीन सौंदर्याची झळाळी दिसून येत आहे.
अध्यक्ष जाचक हे केवळ व्यवस्थापक म्हणून नाही, तर दूरदृष्टी असलेले व कार्यकर्तृत्वपूर्ण नेतृत्व म्हणून ओळखले जात आहेत. स्वच्छतेपासून सुरुवात करत त्यांनी व्यवस्थापनात शिस्त, जनतेत विश्वास आणि विकासात सहभागीपणा या तत्त्वांना मूर्त स्वरूप दिले आहे.कारखान्याच्या प्रगतीसोबतच परिसरातील सामाजिक जबाबदारी जपत, भवानीनगर आणि श्री छत्रपती कारखाना ‘स्वच्छता अभियानात’ उदाहरणवत ठरू लागला आहे.
स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या उपक्रमामुळे कारखान्याचा परिसर, बाजारपेठ आणि वसाहती कचरामुक्त झाल्यामुळे, व्यापारी, ग्राहक, कर्मचारी व स्थानिक नागरिकांकडून याचे प्रचंड कौतुक होत आहे.आजवर अशी सफाई कधीच झाली नव्हती. परिसर खरंच बदलतो आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी दिली. स्वच्छतेचा हा उपक्रम सतत सुरू राहणार असल्याची माहितीही अध्यक्षांनी दिली आहे.





