पुणे जिल्हा : बेकायदेशीर वराह पालनामुळे नागरिक त्रस्त

सोरतापवाडी : हवेली तालुक्यातील नायगाव व पेठ येथे बेकायदेशीर वराह पाळणामुळे नागरिक त्रस्त झाले असून शासन स्तरावर याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या दोन्ही गावातील नागरिकांनी केली आहे.
नायगाव येथील ब्रह्मदेव धोंडीबा मगर व नायगाव हद्दीलगत पेठ येथील मोहन ज्ञानोबा चौधरी यांनी ग्रामपंचायत, पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व इतर कोणत्याही शासकीय विभागाची आवश्यक ती परवानगी न घेता वराह पालन व्यवसाय सुरू केला. या व्यवसायासाठी सडलेले कुजलेले अन्न आणून ते जनावरांना चारले जाते त्यामुळे गावातील नागरिकांना त्या दुर्गंधीचा खूपच त्रास होत असून गेल्या दोन महिन्यांपासून या व्यवसायाच्या दुर्गंधीमुळे दोन्ही गावातील शंभरपैकी जास्त लोक आजारी पडलेले आहे.
या संदर्भात हवेलीच्या अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते यांच्याकडे तक्रार दिली असून त्यांनी मंडळ अधिकारी व ग्रामसेवक यांना संपूर्ण माहिती घेण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे मंडळ अधिकारी गिताश्री काळे व ग्रामसेवक एन. एस. भारती यांनी यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामे केले. याबाबत मगर यांनी पंधरा दिवसात व्यवसाय बंद करणार असल्याचे स्थळ पाहणी दरम्यान सांगितले.
पदाधिकारी म्हणतात..
हा व्यवसाय बंद न झाल्यास जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित बाधित ग्रामपंचायत तक्रारी अर्ज देणार असल्याचे नायगावच्या सरपंच अश्विनी चौधरी यांनी सांगितले. मंडल अधिकारी गिताश्री काळे यांनी सांगितले की, कुठल्याही प्रकारची परवानगीची कागदपत्रे आढळून आली नाही. तसेच दुर्गंधीमुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. आम्ही अहवाल तयार केला असून तो तहसीलदार यांना पाठविणार आहे.
नायगावचे ग्रामसेवक एन. एस. भरती यांनी सांगितले की मंडलाधिकारी यांच्या समवेत ग्रामस्थ यांनी स्थळाचे पाहणी केली असून पंचनामा तयार केला आहे. कुठल्याही परवानगीची कागदपत्रे संबंधित व्यक्तींनी सादर केलेली नाहीत.
नायगावच्या सरपंच अश्विनी चौधरी व पेठच्या सरपंच पल्लवी चौधरी यांनी सांगितले की या बेकायदेशीर वराह पालनामुळे नागरिकांना त्रास होत असून ग्रामपंचायतीने त्याची दखल घेतली असून तसे पत्रक वेळोवेळी संबंधितांना देण्यात आले आहे.





