Pune District : न्हावरे-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर धुळीने नागरीक त्रस्त

निमोणे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर ते न्हावरे (NH548D) सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे नागरिकांना धुळीतून प्रवास करावा लागत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे परिसरातील रहिवासी आणि प्रवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
सध्या पाऊस नसल्याने रस्त्याच्या धूळमुळे नागरिकांना सर्दी, खोकला, डोळे व घसा अशा त्रासांना सामोरे जावे लागत आहे. विशेषता दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यावर धुळीचे लोट उठल्याने समोरून येणारी वाहने दिसेनाशी होतात. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. हा रस्ता काँक्रिटचा तयार करण्यात येणार आहे. या रस्त्याचे काम करीत असलेल्या कंपनीने माळवाडी ते न्हावरे एवढा संपूर्ण रस्ता खोदून ठेवला आहे. अद्याप काँक्रिटीकरणाचे काम चालू झाले नसल्याने येथे मोठया प्रमाणावर धुळ उडते आहे. संबंधित यंत्रणांनी तात्काळ लक्ष घालून ठोस उपाययोजना न केल्यास धुळीचे लोट आंदोलनात बदलण्याची शक्यता आहे.
रस्त्याच्या बाजूच्या शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ
रस्त्याची धुळीमुळे पिकांची वाढ खुंटत आहे. धूळ झाडांच्या छिद्रांमध्ये जमा होऊन वायूंची देवाणघेवाण कमी करते, ज्यामुळे पिकांची वाढ आणखीनच मंदावते याचा परिणाम पिकात रोगराई वाढून उत्पन्न घटते.
संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष?
नागरिकांचे म्हणणे आहे की, दिवसातून किमान ४-५ वेळा पाणी मारणे गरजेचे असताना प्रत्यक्षात फारच कमी प्रमाणात पाणी टाकले जाते. ठेकेदार कंपनी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत नागरिकांनी रास्ता रोकोचा इशारा दिला आहे.
याबाबत निखिल कन्स्ट्रक्शनचे सरव्यवस्थपक अनिल दळवी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही पाणी मारत आहोत, मात्र नागरिकांचा त्रास लक्षात घेता पाणी मारण्याचे प्रमाण वाढवण्यात येईल.





