पुणे जिल्हा | चास कमान धरण ८३ टक्के भरले

राजगुरूनगर : चास कमान धरण ८३ टक्के भरले असून खबरदारी म्हणून धरणाचे पाचही दरवाजे गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता उघडण्यात आले. त्यातून भिमानदीमध्ये ६२८० क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे.
धरणाखाली भिमा नदीला पुराचे स्वरूप आले असून नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भीमाशंकर – भोरगिरी परिसरात पडत असलेल्या जोरदार पावसामुळे भीमा नदीला पुराचे स्वरूप आले आहे. भीमाशंकर भोरगिरी परिसरात ४८ तासात सुमारे ६०० मिलीमीटर पाऊस झाला. त्यामुळे आरळा नदी व भीमा नदीला मोठा पुर येऊन त्याचे पाणी चास कमान धरणात आले. धरणातील पाणी साठा वाढला.
चास कमान धरणात येवा (inflow) वाढला आहे. त्यामुळे चास कमान धरण ८३. ३१ टक्के भरले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणाचे पाचही दरवाजे गुरुवारी रात्री पावणेबारा वाजता उघडण्यात आले आहेत. त्यातून भीमानदी पात्रात ६२८० क्यूसेस वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. धरणाखाली भीमानदी पूर्णक्षमतेने वाहत असून तिला पुराचे स्वरूप आले आहे
पावसाचे प्रमाण वाढल्यास धरणातून जादा विसर्ग करण्यात येणार असल्याने धरणाखालील नागरिकांनी व भीमा नदी काठच्या नागरिकांनी सतर्क राहावे कोणीही पाण्यात उतरू नये असे आवाहन चास कमान धरण उपअभियंता ए के पवार, उपअभियंता शुभम सुसुंदरे यांनी केले आहे. खेड तालुक्यातील भामा आसखेड चास कमान व कळमोडी धरण क्षेत्रात झालेला पाऊस धरणातील पाणी पाणी पातळी टक्केवारी पुढील प्रमाणे
तपशील
चास कमान
भामा आसखेड
कळमोडी
पाणी पातळी ( घनमीटर )
६४७.४७
६६५.६०
६८७.००
एकूण साठा (दशलक्ष घनमीटर)
२०५. ९१
१४९.६७
४२. ८७
उपयुक्त पाणी साठा (दशलक्ष घनमीटर)
१७८.७२
१३६.१५
४२.६७
टक्केवारी (%)
८३.३१
६२.७१
१००
१ जून पासून झालेला पाऊस (मिलीमीटर)
५५६
६७४
८०३
धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग (क्युसेस )
६२८०
००
२९७४





