Pune District : महाळुंगे इंगळेत पाणीबाणीची शक्यता!

महाळुंगे इंगळे : महाळुंगे इंगळे हे खेड तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचे गाव समजले जाते या गावाच्या चारही बाजूला मोठ्या औद्योगीकरण झाल्याने येथे मोठ्या प्रमाणात लोकवस्ती झाली आहे. मात्र, त्यामानाने पाण्याचे स्त्रोत कमी असून ज्याने त्याने बोअरवेल घेतल्या असल्याने भूगर्भातील पाणीही कमी झाली.
त्यातच उन्हाचा चटके वाढले असून बोअरवेल, विहिरींचे पाण्याने तळ गाठला असल्याने महाळुंगे इंगळे गावात फेब्रुवारीतच टँकरची मागणी झाली असून मार्च, एप्रिलमध्ये पाणीबाणी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहे.
मागील वर्षी चांगला पाऊस पडून देखील जानेवारी महिन्यापासूनच बोरवेलने तळ गाठण्यास सुरुवात झाल्याने टँकरने पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे याशिवाय ग्रामपंचायतीने सुरू केलेल्या जलजीवन मिशनचे काम देखील अपूर्ण आहे. त्यामुळे यंदाच्या उन्हाळ्यात उन्हाचे चटके आणि पाण्याचा तुटवडा ही चिंतेची बाब ठरणार आहे.
गावात विहिरी व बोअरवेल असून पाण्याची पातळी खोल गेल्याने या गावात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, कायमस्वरूपी पाण्याची सोय व्हावी यासाठी पाणीपुरवठा योजना सुरू करावी; अन्यथा योजना करण्याबाबत उपाययोजना करावी, अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत.





