पुणे जिल्हा : बिबट्या शिकारीसाठी चक्का माजी सरपंचाच्या दारात

कुत्र्याची सहीसलामत सुटका : परिसरात भीतीचे वातावरण
नारायणगाव – जुन्नर तालुक्यात बिबट्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली असून दररोज कुठे ना कुठे बिबट्याचे हल्ले होत असल्याच्या घटना घडत आहेत. अशा परिस्थितीतच शुक्रवारी (दि.17) रात्री दहाच्या सुमारास नारायणगावचे माजी सरपंच ज्योत्स्ना सुरेश फुलसुंदर यांच्या घराच्या ओट्यावर पाळीव कुत्र्याची शिकार करण्यासाठी आलेल्या बिबट्याचा पाय घसरल्यामुळे बिबट्याने घराच्या दरवाजा समोरच ओट्यावर बसून घेतले. त्यामुळे काही काळ फुलसुंदर यांच्या घरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; परंतु बिबट्याच्या तावडीतून कुत्र्याची सहीसलामत सुटका झाली.
फुलसुंदर कुटुंब दररोज रात्री घरासमोरील ओट्यावर रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसलेले असतात. परंतु शुक्रवारी रात्री पाऊस पडू लागल्याने त्यांचे कुटुंब घरात बसलेले होते. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा होता. धावपळीत बिबट्याच्या तावडीतून शिकार निसटल्यानंतर बिबट्याने माजी सरपंचाच्या घराच्या दारासमोर बसून घेतले. घराच्या ओट्यावर बिबट्या आणि कुत्र्याच्या झटापटीचा आवाज आल्याने ज्योत्स्ना फुलसुंदर यांनी बाहेर बघितले असता बिबट्या चक्क घराच्या ओट्यावर दरवाजापासून एक फूट अंतरावर ठाण मांडून बसला असल्याचे दिसून आले. अचानक बिबट्या दारासमोर आल्याने फुलसुंदर यांची धांदल उडाली.
घडलेल्या घटनेची माहिती सुरेश फुलसुंदर यांनी वारूळवाडी गावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ यांना फोनद्वारे कळविली. त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी येऊन फटाके फोडले. दरम्यान बिबट्या शेजारी असलेल्या बाजरीच्या शेताच्या दिशेने निघून गेला होता. परिसरातील नागरिकांनी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली असून लवकरात लवकर पिंजरा लावला जाईल, अशी माहिती जुन्नर वनविभागाने दिली.
वनविभागाच्या सूचना
जंगलात बिबट्याला शिकार मिळत नसल्याने मानवी वस्तीकडे येऊ लागला असल्याचा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या वतीने करण्यात आला आहे. त्यामुळे घराच्या आजूबाजूला शेती असलेल्या रहिवाशांनी सतर्क राहून रात्रीच्यावेळी लहान मुलांना घराबाहेर एकटे सोडू नये, तसेच घराच्या बाहेरील बाजूस रात्रभर विजेचे दिवे चालू ठेवावे असे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याची पूर्ण माहिती घेऊन नागरिकांच्या सुरक्षेसाठी वरिष्ठांच्या सूचनेनुसार निर्णय घेण्यात येतील असे वनपाल अनिता होले, वनरक्षक ज्ञानेश्वर पवार, खंडू भुजबळ यांनी सांगितले.





