Pune District : चाकणकरांचा आक्रोश न्यायालयात

वाहतूकोंडीवर खेड वकील बार असोसिएशन उठवला आवाज
मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करणार – अॅड. वैभव कर्वे
राजगुरूनगर – खेड तालुक्यातील चाकण परिसरात पुणे – नाशिक आणि शिक्रापूर-तळेगाव राष्ट्रीय महामार्गावर होणार्या नित्याची वाहतूक कोंडी आणि सततच्या जीवघेणे अपघात याबाबत मुंबई उच्च न्यायालयात खेड (राजगुरूनगर) वकील बार असोसिएशनच्या वतीने लवकरच जनहित याचिका दाखल करणार असून तसा आम्ही सर्व वकिलांनी ठराव केला आहे, अशी माहिती खेड वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. वैभव कर्वे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग आणि तळेगाव शिक्रापूर राष्ट्रीय महामार्गावर चाकण परिसरात होणारी दररोज मोठी वाहतूक कोंडी, मोठे जीवघेणे अपघात याबाबत केंद्रीय आणि राज्य पातळीवर दखल घेतली जात नाही. रोजच्या वाहतूक कोंडीला नागरिक पुरता वैतागला आहे. नोकरदार, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांसह वाहनचालक यांचे वाहतूक कोंडीत अतोनात हाल होत आहेत.
तासन्तास वाहतूक कोंडीत अडकून बसावे लागते. त्यातच चाकण शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग हा अरुंद रस्ता नित्याच्या मोठ्या अपघातामुळे मृत्यूचा साफळा बनला आहे. या महामार्गावर अनेक अपघात होत असल्याने निष्पाप लोकांचे प्राण जात आहे. चाकण वाहतूक कोंडी आणि वाढते अपघात याबाबत राजगुरूनगर वकील बार असोसिएशनच्या वतीने गुरुवारी (दि.3) बैठक घेऊन मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा ठराव घेण्यात आला. त्यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली.
या पत्रकार परिषदेत चाकण वाहतूक कोंडी आणि होणार्या अपघाताबाबत चिंता व्यक्त करीत जनहित याचिका दाखल करणार असल्याचे बारचे अध्यक्ष अॅड. वैभव कर्वे यांनी सांगितले. यावेळी बारचे उपाध्यक्ष अॅड. शंकर कोबल, सचिव अॅड. नवनाथ कड, अॅड. अनिल राक्षे, ज्येष्ठ वकील अॅड. चंद्रकांत सांडभोर, अॅड. मनिषा पवळे, अॅड. विक्रम कड, अॅड. सुभाष करंडे, अॅड. मनोहर जंबुकर, अॅड. अरुण मुळुक, अॅड. आरती सैद, अॅड. रुकसाना पठाण, अॅड. प्रवीण बोंबले, अॅड. दीपक थिगळे, अॅड. करण कांबळे, अॅड. मीनानाथ साबळे आदी वकील यावेळी उपस्थित होते.
लोकप्रतिनिधी याबाबत पडताहेत कमी
चाकण येथे जागतिक दर्जाची एमआयडीसी आहे. त्यात काम करणारा व पुणे-मुंबई येथे जाणारा नोकरवर्ग मोठा आहे. शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षणासाठी या महामार्गावरून जाणार्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. चाकण येथे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर दररोज वाहतूक कोंडी नित्याची आहे त्यातच तळेगाव-शिक्रापूर राष्ट्रीय महामार्ग रस्ता अरुंद असल्याने आणि त्यावर खड्डे पडल्याने जीवघेणे अपघात होत आहेत. लोकप्रतिनिधी याबाबत कमी पडत आहेत. राज्य आणि केंद्र सरकार या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष देत नाही. या ज्वलंत प्रश्नावर खेड बार असोसिएशनच्या हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत, असे अॅड. कर्वे यांनी नमूद केले.





