Pune District : चाकण एमआयडीसी अवैधधंद्यांचे कुरण!

हप्ते वसुली जोरदार : प्रशासन मूगगिळून गप्प
महाळुंगे इंगळे – उद्योग पंढरीचे नाक असलेल्या चाकण औद्योगिक परिसरात सुरू असलेल्या अवैध धंदे व वेश्या व्यवसाय पोसणारी खूप मोठी समांतर यंत्रणा सुरू आहे. त्यामुळे चाकण व परिसरातील अवैधधंदे काही जणांसाठी चरण्याचे मोठे कुरण झाले आहे.
अवैधधंदे चालविण्यासाठी दर महिन्याला ठराविक रक्कम दिले जाते. याच अवैध धंदाचालकांकडून प्रशासनाच्या मुकसंमतीने काही तथाकथित राजकीय पदाधिकारी, त्यांच्या जवळचे कार्यकर्ते देखील दरमहा पैसे उकळतात, हे वास्तव आहे. यासंदर्भात अनेक धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. चाकण औद्योगिक भागातील अवैधधंद्यांच्या जोरावर काही संघटनांचे पदाधिकारी म्हणून मिरवणारे कार्यकर्ते, त्यांचे सोबती हप्ते वसुली करीत असल्याची बाब समोर आली आहे.
यामध्ये लॉजिंग, काही हॉटेल्स, गॅस रिफिलिंग, दारू विक्री, मटका, जुगार अशा अनेक धंद्यांचा समावेश आहे. या ठिकाणांवरून संबंधित यंत्रणेला दर महिन्याला रक्कम दिली जाते. याशिवाय अशा धंद्याविरोधात पत्र व आंदोलनाचे इशारे देणार्या कार्यकर्त्यांना दर महिन्याला ठराविक रक्कम दिली जाते. प्रशासनातील काही मंडळी आणि संबंधित व्यवसाय चालक यांच्यातील मिलीभगतमुळे हे सर्व काही आलबेल होत असल्याचे दिसून येते. धंदे सुरू ठेवण्यासाठी या सर्वांना सांभाळणे संबंधित यंत्रणेसाठी गरजेचे झाले आहे.
उद्या पोलीस ठाण्यासमोर उपोषण
या अवैधधंद्यांना सांभाळणारी यंत्रणा उद्ध्वस्त करण्यासाठी आंबेडकर जन मंच सामाजिक संघटनेचे अध्यक्ष नागेश शिंदे हे महाळुंगे इंगळे (ता. खेड) एमआयडीसी पोलीस ठाण्यासमोर सोमवारी (दि.14) उपोषणास बसणार आहेत. उपोषणास बसणार असल्याबाबतचे पत्र शिंदे यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, पोलीस आयुक्त, उपायुक्त, पोलीस निरीक्षक आदींना दिली आहेत.
चाकण औद्योगिक वसाहतीत कोणत्याही अवैधधंद्यांना थारा नाही तसेच अभयही दिले जात नाही. तरी कोठे असे अवैधधंदे सुरू असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा तातडीने कारवाई केली जाईल.
– दिगंबर सूर्यवंशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, महाळुंगे इंगळे





