ट्रक चालकासह इतर दोनजण जखमी : आंदोलनाचा इशारा
मंचर – लोणी ते मंचर (ता. आंबेगाव) येथील रस्त्यावर निरगुडसर फाटा हांडेवस्तीजवळ सिमेंट मालवाहू ट्रक शुक्रवारी (दि. 28) सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास उलटला आहे. या अपघातात ट्रक चालक आणि इतर दोनजण जखमी झाले आहेत. रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे गेल्या तीन दिवसात तीन वाहने येथे उलटली आहेत.
या अपघातात ट्रकचालक सुखदेव भेके (वय 52), संदीप इंदोरे (वय 38) आणि गणपत पारधी (रा. मंचर ता.आंबेगाव) हे जखमी झाले आहेत. लोणी ते मंचर रस्त्यावर निरगुडसर फाटा व हांडेवस्तीजवळ रस्त्याचे सिमेंटकॉंक्रिटचे काम चालू आहे. निरगुडसर फाट्यांजवळ काम पूर्ण झाले आहे; पण हांडे वस्तीजवळ रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटचे काम संथ गतीने चालू आहे. याबरोबरच एकाच बाजूचा रस्ता पूर्ण झाल्याने मोठ्या वाहनांना वाहन चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे, त्यामुळे या रस्त्यावर सध्यातरी अपघाताची मालिका सुरू आहे.
या रस्त्यावर बुधवारी (दि. 26) एक सिमेंट मिक्सर टॅंकर (एमएच 12, ईएफ 2257) हा उलटला होता. गुरुवारी (दि. 27) रात्री एक चारचाकी वाहनही रस्त्याच्या बाजूला साईडपट्ट्या व्यवस्थित भरल्या नसल्याने खाली गेला. यावेळेस स्थानिक तरुणांनी ती चारचाकी गाडी उचलून व्यवस्थित रस्त्यावर आणली. यानंतर आता शुक्रवारी (दि. 28) पुन्हा सकाळी मंचर येथून सिमेंट गोणी भरून लोणी येथे चाललेला सिमेंट वाहतूक करणारा ट्रक उलटला आहे.
लोणी, पाबळवरून मंचरला जाण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्याने लहान-मोठ्या वाहनाची येथे मोठी वर्दळ असते.सार्वजानिक बांधकाम विभाग आणि सबंधित ठेकेदाराने रस्त्याचे उर्वरीत काम त्वरीत पूर्ण करावे. रस्त्याच्या साईडपट्ट्या व्यवस्थित भरून घ्याव्यात, अशी मागणी पोलीस पाटील विठ्ठल वळसे, तंटामुक्ती गाव समितीचे माजी अध्यक्ष युवराज हांडे, सोसायटीचे माजी अध्यक्ष सुरेश आवारी, धनेश टाव्हरे, महादेव गवारी यांसह ग्रामस्थ व वाहन चालकांनी केली आहे. दरम्यान रस्त्याची दुरुस्ती लवकर न झाल्यास तीव्र आंदोलन करू, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.