पुणे जिल्हा : गावपुढार्यांची हाक, मतदार राजाचा आहे धाक

गावाच्या विकासासाठी नाहीतर स्वतःच्या विकासासाठी गावपुढारी विविध पक्षांबरोबर
सोरतापवाडी – शिरूर-हवेली विधानसभा निवडणुकीत गाव पुढारी मतदारांना आपल्या पक्षाला मतदान करण्याची हाक देत असून मतदार राजा या गाव पुढार्यांना जुमानता नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे गावपुढारी चांगलेच अडचणीत आले असून नेत्यांना काय सांगावे, याची चिंता यांना लागली आहे.
20 तारखेला होणार्या शिरूर-हवेली विधानसभा निवडणुकीत गाव पुढारी मतदार राजाला मतासाठी आपल्याच पक्षाला मतदान करा, असे सांगत असल्याची चर्चा पूर्व हवेलीतील अनेक गावात आहे. गावपुढार्यांपासून मतदार राजा अलिप्त असल्याचे दिसून येत आहे.
शिरूर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)गटाचे उमेदवार अॅड. अशोक पवार तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे उमेदवार माऊली कटके हे एकमेकांसमोर निवडणूकीत उभे आहेत दोघांच्या प्रचाराचा धडाका जोरात चालू आहे. याविषयी अनेक गावकर्यांशी चर्चा केली असता नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, राज्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट झाले आहे. यामध्ये गावागावातील पुढारी स्वतःच्या फायद्यासाठी सोईचे राजकारण करत आहेत.
कुठल्या पक्षात आपण गेलो की आपले स्थान बळकट कसे होईल व आपल्याला फायदा कसा होईल, हे गावपुढारी बघत आहेत. त्यामुळे जनतेचा गावपुढार्यांवरील विश्वास उडाला आहे. गावपुढारी सकाळी एका नेत्यांच्या बरोबर तर संध्याकाळी दुसर्या नेत्यांच्या बरोबर दिसत आहे.
तसेच एका घरातील माणसे दोन्ही पक्षांमध्ये दिसत असून, यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा अशी चर्चा पूर्व हवेलीत चालू आहे. गावपुढार्यांची पक्षनिष्ठा संपली असून हे गावाच्या विकासासाठी नाहीतर स्वतःच्या विकासासाठी विविध पक्षांबरोबर दिसून येत असल्याची चर्चा सध्या नागरिकांमध्ये सुरू आहे.
गावपुढारी फक्त नेत्यांच्या बरोबर फिरून वेळकाढू पणाची भूमिका घेत आहेत. एकमेकांचे कट्टर शत्रू स्वतःच्या फायद्यासाठी एकत्र आले असून गावगाड्यात मात्र गाव पुढारी वेगवेगळ्या भूमिकेत लवकरच पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे मतदारराजा संभ्रमावस्थेत असून आपण गाव पुढार्यांचे का ऐकायचे या विचारात मतदार राजा आहे. त्यामुळे मतदान करताना गाव पुढार्यांचे कुणीही ऐकणार नसल्याचे दिसून येत आहे.





