पुणे जिल्हा : आयटीनगरीतील प्रश्न सोडवून विकासाला गती देणार – दगडे

हिंजवडी : हिंजवडीत आयटी पार्क झाले, पण याचा फायदा तालुक्याला किती झाला. तालुक्यातील मुलांना किती रोजगार मिळाले, कंपन्यांचा सीएसआरचा निधी कुठे गेला, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. हजारो कोट्यवधीची उलाढाल येथे होत असेल, तर मुळशी तालुक्याचा विकास का झाला नाही. असा संतप्त प्रश्न भोर विधानसभा मतदारसंघातील उमेदवार किरण दगडे पाटील यांनी उपस्थित करत, हिंजवडी आयटी पार्कचे सर्व प्रश्न सोडविण्याबरोबरच मुळशीच्या विकासाला गती देणार असल्याचे अश्वासन दगडे पाटील यांनी दिले.
भोर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार किरण दगडे यांनी हिंजवडी परिसरात पदयात्रेच्या माध्यमातून मतदारांशी संवाद साधला. यावेळी सोसायटी परिसरासह ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी नागरिकांनी हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी, स्वच्छता यांसह अन्य समस्यांचा पाढा वाचला. त्यावर किरण दगडे यांनी या समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
ते पुढे म्हणाले, हिंजवडी आयटी पार्कमधून मिळणारा सीएसआरचा निधी मुळशी तालुक्याच्या विकासासाठी वापरला तर देशातील हायटेक तालुका म्हणून ओळख होईल. मात्र गेल्या अनेक वर्षात हा विकास का झाला नाही, निधी गेला कुठे हा विचार करण्याची वेळ आली आहे.
मुळशीचा विकास करायचा असेल तर मला फक्त एक संधी द्या, त्या संधीचे सोनं करून दाखवेल. भोर विधानसभा मतदार संघातील प्रत्येक गावांचा विकासासाठी, तेथील तरूणांना रोजगाराच्या संधी देण्याबरोबरच शहराप्रमाणे गावेही सर्व सोयी-सुविधांनी समृध्द करण्यासाठी मी कटीबद्ध राहील, असा विश्वास दगडे यांनी मतदारांशी संवाद साधताना दिला. मी तुम्हाला आता देतो.
हिंजवडी आयटी पार्कमुळे परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या, इमारतीत उद्याने झाली. मात्र, सर्वसामान्य आणि ग्रामीण भागातील मुलांसाठी उद्याने किंवा खेळण्यासाठी खेळणी कुठे? या मुलांनाही खेळाची मैदाने आणि उद्यानांमध्ये आनंद उपभोगता यावा यासाठी माझा प्रयत्न असेल.
-किरण दगडे पाटील, अपक्ष उमेदवार, भोर विधानसभा





