पुणे जिल्हा : “त्यांच्या’ प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

राजगुरूनगरमध्ये माजी आमदार आशिष देशमुख, पोलीस निरीक्षक बकालेंचा निषेध
राजगुरूनगर : मराठा आरक्षणाबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्या भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख व पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांच्या प्रतिमेला चपला मारून त्यांच्या प्रतिमात्मक पुतळ्याचे पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरूनगर येथे मराठा क्रांती मोर्चा व खेड तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) पक्षाच्या वतीने दहन करण्यात आले.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी राजगुरूनगर येथे गेली सहा दिवसांपासून खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा वतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. दरम्यान, माजी आमदार आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी जालना जिल्ह्यात जरांगे पाटील यांच्या उपोषणा दरम्यान मराठा समाजाला सरसकट जातीचे दाखले देऊ, असे कोणतेच आश्वासन राज्य सरकारने दिलेच नाही. जरांगे पाटील भूलथापा मारतात. जरांगे यांनी जनतेची फसवणूक करू नये, असे बेताल वक्तव्य केले होते. तर मराठा समाजाबद्दल पोलीस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी पोलीस कर्मचाऱ्याबरोबर मराठा आरक्षणाबाबत बेताल व्यक्तव्य केल्याची व्हाईस रेकॉर्डिंग क्लिप सर्वत्र व्हायरल झाली आहे.
मराठा मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या (अजित पवार गटाच्या) पदाधिकाऱ्यानी मराठा आंदोलनाला यावेळी पाठिंबा देत पुतळा दहन आंदोलनात सहभागी झाले यावेळी तालुका अध्यक्ष कैलास सांडभोर, खेड बाजार समिती सभापती कैलास लिंभोरे, संचालक जयसिंग भोगाडे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती अरुण चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबा राक्षे, युवक शहरअध्यक्ष सागर सातकर, खेड तालुका मराठा क्रांती मोर्चा तालुका अध्यक्ष मनोहर वाडेकर, अंकुश राक्षे, विकास ठाकूर, दिलीप होले, मनसेचे मंगेश सावंत, ऍड. सचिन साबळे, बाळासाहेब चौधरी, सोपान डुंबरे, बबन शिवले, बहुळचे सरपंच अश्विनी साबळे, वैभव नाईकडे आदी उपस्थित होते.
आरक्षण मराठा समाजाचा हक्क आहे तो मिळालाच पाहिजे मराठा जात नसून साम्राज्य आहे. मराठा आरक्षणाबरोबर शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव मिळाला पाहिजे.
– अश्विनी साबळे, सरपंच, बहूळ
20 वर्षांपूर्वी खेड तालुक्यात मराठा आरक्षणाची सुरुवात झाली. आज त्याची व्याप्ती राज्यभर वाढली आहे. खेड तालुका क्रांतिकारकांची भूमी आहे. सर्वात जास्त गुन्हे मराठा समाजातील नागरिकांवर दाखल झाले आहेत. गुन्हे मागे घेतले नाहीतर तालुक्यात राजकीय नेत्यांना फिरकू देणार नाही असा ठराव घ्यावा.
– कैलास लिंभोरे, सभापती, बाजार समिती, खेड





