Pune Distric: हिंगणीबेर्डीत सामूहिक ड्रोन फवारणी

मलठण : आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत आधुनिक पद्धतीने शेती करण्याला प्राधान्य देत आहे. याचा प्रत्यय हिंगणीबेर्डी, जोतिबा नगर येथील शेतकऱ्यांनी सूर्यफूल पिकावरती सुमारे दहा एकर क्षेत्रावरती ड्रोनद्वारे औषध फवारणी प्रात्यक्षिक घेण्यात आले.
कृत्रिम बुद्धिमत्ता (Ai) तंत्रज्ञान व ड्रोन तंत्रज्ञान यामुळे पुढील काळात मोठा बदल शेती क्षेत्रामध्ये पाहायला येऊ शकतो. कमी वेळात जास्त क्षेत्र व पाणी व औषधाची बचत यामुळे लवकरच हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत चाललेला आहे. जास्त उंचीच्या दलदलीयुक्त व जिथे मनुष्य जाऊ शकत नाही, अशा ठिकाणी चांगल्या प्रकारे ड्रोन द्वारे फवारणी करता येत आहे.
प्रात्यक्षिकाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी राहुल माने, मंडळ कृषी अधिकारी दिनेश फडतरे, कृषी पर्यवेक्षक शितल मगर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी सहाय्यक शिवाजी कदम यांनी केले. सुनील ढवळे, ज्ञानेश्वर कतुरे, दत्तात्रय खोमणे, प्रफुल्ल कामठे, माऊली ढवळे, प्रशांत भोसले या शेतकऱ्यांनी सूर्यफूल पिकावर फवारणी केली आहे.
ड्रोनद्वारे फवारणीचे फायदे किंवा वैशिष्ट्ये
आठ ते दहा मिनिटांत एकराची फवारणी
१० लिटर पाण्यात एकरची फवारणी
फवारणी करताना शेतकऱ्यांमध्ये होणारी विषबाधेपासून सुरक्षा
४०% औषधात बचत
मजूर जास्त लागत नाहीत
मोठ्या पिकांना फवारणी करता येते
ऊस, सूर्यफूल, फळबाग, मका व इतर
भिजवलेले शेत, चिखलापासून मुक्ती
सूर्यफूल पिकाची वाढ चांगली झाल्यामुळे त्याच्यामध्ये औषध मारणे कठीण जात आहे. कांदा, हरभरा, गहू पिकाच्या काढणीमुळे मजूरही सध्या उपलब्ध नसल्यामुळे आम्ही सूर्यफूल लागवड केलेली शेतकरी मिळून ड्रोन फवारणी करण्याचा निर्णय घेतला आहे.
– प्रशांत भोसले, सूर्यफूल उत्पादक शेतकरी, हिंगणी बेर्डी.





