Pune district : आधुनिक शिक्षण पद्धती अंगीकारावी- प्रदीप गारटकर

इंदापूर – विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण पद्धती स्वीकारून वाटचाल करावी व पूर्वीची शिक्षण पद्धती व आत्ताची शिक्षण पद्धती यामध्ये होत चाललेला आमूलाग्र बदल होत असून तंत्रज्ञानाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर सध्याचे जीवन पद्धतीवर दिसून येत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून समाजातील गोरगरीब वंचित बहुजन मुला-मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली आणि या माध्यमातून अनेकांनी आपला उत्कर्ष करून घेतला हे कार्यपुढे चालू ठेवण्यासाठी प्रत्येकाने सामाजिकतेचे भान ठेवावे.असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष शाळा समितीचे सदस्य प्रदीप गारटकर यांनी केले.
रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 138 व्या जयंतीनिमित्त कर्मवीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शाळा समितीचे सदस्य प्रदीप गारटकर बोलत होते.
कार्यक्रमासाठी प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. किशोरी सातव यांनी कर्मवीरांचा जीवन परिचय विद्यार्थ्यांसमोर मांडला व शालेय जीवनात कशा पद्धतीने आपण मार्गक्रमण करावे व आपला बहु अंगी विकास करून घ्यावा याबद्दल मार्गदर्शन केले.विद्यालयातील दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना व विविध स्पर्धांमध्ये प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. तसेच आदर्श विद्यार्थी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविक मधून पर्यवेक्षिका पुष्पा काळे यांनी विद्यालय राबवत असलेल्या विविध उपक्रमाबद्दल माहिती दिली. विस्ताराधिकारी संजय रुईकर, शाळा समितीचे सदस्य विठ्ठल ननवरे, श्रीधर बाब्रस यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य संजय कुमार शिंगारे, माजी नगरसेविका राजश्री मखरे, दादासाहेब सोनवणे, हरिदास हराळे, सेवानिवृत्त शिक्षक पोपटराव जाधव, छाया जाधव, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुनील जाधव, रेश्मा शेख, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील मोहिते व अश्विनी अभंग यांनी केले.




