पुणे जिल्हा : राजकारणातील दादागिरी नामोहोरम होणार?

पवार गटाने चंग बांधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा
छत्रपती कारखाना निवडणूक अजितदादांना पुढे आव्हान
गोकुळ टांकसाळे
भवानीनगर – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आणि कुटुंबातच रंगलेला कलगितुरा जनतेला रुचलेला नाही. त्यातच शरद पवारांनी उभ्या केलेल्या पक्षाचे नाव वापरून निवडणूक लढवली आणि अनेक मतदारसंघात दादागिरीची वापरलेली भाषा अजित पवारांच्या चांगलीच अंगलट आली असून त्यांचा होमपीचवर दारूण पराभव झाला आहे. हाच धागा पकडत आणि जनतेने भरभरून दिलेल्या आशीर्वादावर आता अजितदादांना सहकरातही मात देऊन राजकारणातील दादागिरी नामोहोरम करण्याचा चंगच चंग राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाने बांधला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात भरघोस मतांनी विजयी झालेल्या खासदार सुप्रिया सुळे या इंदापुरात आल्या असता त्यांनी तुतारी चिन्हाचा पॅनल छपत्रती सहकारी साखार कारखान्याच्या निवडणुकीत उतरविण्याचा निर्णय जाहीर केला आणि राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, सध्या तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हा छत्रपती सहकारी साखर कारखाना असल्याने हे नेतृत्व टिकवून ठेवण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापुढे हे मोठे आव्हान असणार हे मात्र नक्की.
पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यातच पत्नी सुनेत्रा पवार आणि शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करण्यासाठी अजित पवार यांची जादू कुचकामी ठरली. त्यांच्या दादारीगिरी आणि दंडेलशाहीला मतदारांनी साफ नाकारले असल्याने आगामी निवडणुकीत अजितदादा आपला हेका सोडून जनतेच्या मनात पुन्ह अधिराज्य गाजवणार का, हे छत्रपती कारखाना निवडणुकीतून समजेल मात्र, तोपर्यंत वेट अँड वॉचचीच भूमिका पार पाडावी लागणार हे मात्र नक्की!
त्यावेळेपासूनच चर्चेला उधाण
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाच्या माध्यमातून खासदार सुप्रिया सुळे यांचा प्रचार इंदापूर तालुका मध्ये सुरू असतानाच शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांच्या उपस्थितीमध्ये श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये तुतारी चिन्हाचे पॅनल तयार करण्याचे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे त्या वेळपासूनच श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील राजकीय वातावरणामध्ये बदल झालेला असून येणार्या काळामध्ये कारखान्याची निवडणूक ही नक्कीच ऐतिहासिक निवडणूक ठरणार आहे.
फोटो : कारखाना, अजितदादा





