Pune District : लक्ष्मीपूजनानिमित्त झेंडूच्या फुलांना मोठी मागणी; करमोळीतील अमोल केदारी यांची फुलशेती बहरली
Pune District : केदारी यांच्या शेतात सध्या पिवळ्या आणि केशरी रंगांच्या झेंडूच्या फुलांनी बहर आला असून संपूर्ण शेत फुलांनी रंगून गेले आहे.

पौड : दिवाळी सणातील लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर झेंडूच्या फुलांना बाजारपेठेत मोठी मागणी निर्माण झाली आहे. लक्ष्मीपूजन, घरांची सजावट, तोरणे तसेच धार्मिक कार्यक्रमांसाठी झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असल्याने बाजारात फुलांची मागणी वाढली आहे. या वाढत्या मागणीचा विचार करून करमोळी येथील शेतकरी अमोल केदारी यांनी आपल्या शेतात झेंडूची फुलशेती फुलवली आहे.
केदारी यांच्या शेतात सध्या पिवळ्या आणि केशरी रंगांच्या झेंडूच्या फुलांनी बहर आला असून संपूर्ण शेत फुलांनी रंगून गेले आहे. फुलांचा आकर्षक रंग आणि बहरलेली रोपे पाहून शेतातील दृश्य लक्षवेधी ठरत आहे. सणासुदीच्या काळात झेंडूच्या फुलांना विशेष मागणी असते. त्यामुळे पारंपरिक शेतीबरोबरच फुलशेती हा शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा चांगला पर्याय ठरत आहे.
शेतीमध्ये बदलत्या बाजारपेठेचा अंदाज घेऊन विविध पिकांची लागवड करणे आवश्यक बनले आहे. त्यातून कमी कालावधीत उत्पन्न मिळवण्याची संधी फुलशेतीच्या माध्यमातून उपलब्ध होत आहे. अमोल केदारी यांनी केलेला हा फुलशेतीचा प्रयोग परिसरातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
सणासुदीच्या काळात झेंडूच्या फुलांना मिळणारी मागणी आणि फुललेली शेती यामुळे करमोळी परिसरात फुलशेतीची चर्चा रंगू लागली आहे.





