पुणे जिल्हा : गट, गणांत राजकीय घडामोडींना ब्रेक

आरक्षण स्थगितीमुळे इच्छुकांचे ‘वेट ऍन्ड वॉच’
विशाल भालेराव
खडकवासला – राज्यातील जिल्हा परिषद गट व पंचायत समितीच्या गणांसाठी 13 जुलै रोजी होणाऱ्या आरक्षण सोडत होणार होती. यावर करडी नजर ठेवत इच्छुकांनी गावागावांत जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली होती. मात्र मंगळवारी (दि. 12) राज्यातील सर्व नियोजित जिल्हा परिषद व पंचायत समितीआरक्षण सोडतीला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे गावागावांत इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला ब्रेक लागल्याचे दिसून येत आहे. तसेच आरक्षण स्थगितीमुळे पुणे जिल्ह्यात कही खुशी कही गम वातावरण दिसून येत आहे. सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणा संदर्भात झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाने 92 नगरपरिषदांच्या निवडणुकीला स्थगिती देण्यात नकार दिला असला, तरी येथे 19 जुलै रोजी पुढील सुनावणी ठेवली आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या राजकीय समीकरणांनी वेग घेतला आहे. डोणजे – मांगडेवाडी गट, खानापूर, मांगडेवाडी गणात राजकीय घडामोडी जोरात सुरु आहेत. या गटातील काही गावे महानगरपालिका हद्दीत गेल्याने या गट आणि गणात बदल होण्याची शक्यता आहे.
कॉंग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मनसे आदी पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाअंतर्गत बंडाळी रोखण्यासाठी पक्षश्रेष्ठींची कसरत या गटात पहावयास मिळत आहे. मागील निवडणुकीत या गटावर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पुजा पारगे जिल्हा परिषद सदस्या होत्या. तर पंचायत समिती खानापूर गणात सीमा पढेर या शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्य होत्या. मांगडेवाडी गणात अनिरुद्ध यादव भाजपचे पंचायत समिती सदस्य होते.
पक्षाच्या वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गट व गणात इच्छुकांना उमेदवारी देण्याच्या तयारीत शिवसेना आहे. तसेच या गटात आपल्या पक्षाचे उमेदवार रिंगणात उतरवण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने कंबर कसली आहे. राष्ट्रवादी पक्षाबरोबरच भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांनी भाजपच्या उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. कॉंग्रेसने या गटात आपले उमेदवार उतरवण्याची जय्यत तयारी केली आहे. या भागात मनसेचे वर्चस्व कमी असले तरी उमेदवार उभे करण्यासाठी पक्षपातळीवरून प्रयत्न सुरू आहेत. हात, घड्याळ, कमळ, धनुष्य बाण, रेल्वे इंजिन तर काही अपक्ष चिन्हांवर उमेदवारी मिळवून निवडणूक लढवताना ऐनवेळी राजकीय कोलांटउड्या या गटात दिसण्याची शक्यता आहे.
पक्षश्रेष्ठींची मनधरणी…
पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी इच्छुकांनी पक्षश्रेष्ठींची मनधरणी बरोबरच गट व गणातील कार्यकर्त्यांना जवळ घेऊन दबाव तंत्राचा वापर करून कुठल्याही परिस्थितीत पक्षाचे तिकीट मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांचा कस लागणार आहे. भाजप-सेना व कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची युती झाली नाही. तर या गटात व गणात अत्यंत चुरशीच्या लढती पाहावयास मिळणार आहेत.





