पुणे जिल्हा : भैरवनाथनगरात बहिष्कार अस्त्र कायम

गावकरी अद्याप आक्रमक : मतदान प्रकियेत काहीजणांचा सहभाग
तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील भैरवनाथनगर शासनाच्या गायरान गटात शासकीय घरकुल योजनेतून घर मिळालेल्या नागरिकांना १९७३ पासून भौतिक सुखसविधा मिळत नसल्याने नागरिकांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यानुसार नागरिकांनी मतदान न करता बहिष्कार कायम ठेवत मतदान न करण्याच्या निर्णय घेतला होता. तुरळक मतदार वगळता बाकीच्या सर्व नागरिकांनी बहिष्काराला साथ दिली.
तळेगाव ढमढेरे येथील भैरवनाथ गायरानात १९७३ पासून घरकुल योजनेच्या माध्यमातून येथे लोकवस्ती प्रस्थापित झाली. ५० वर्षापासून नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. मुख्य रस्ता, अंतर्गत रस्ता, पाणी, पथदिवे, गटार लाइन आदी सुविधा अनेक वर्षापासून मागणी करूनही मिळत नसल्याने कंटाळून नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. याबाबतचे फ्लेक्स देखील गावातील मुख्य ठिकाणी लावले होते. भैरवनाथनगरमध्ये एकूण ३०० च्या आसपास मतदार आहेत.
ग्रामप्रशासनाला तसेच तालुका व जिल्हा प्रशासनाला वारंवार विनंती करूनही या लोकवस्तीकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांनी हा निर्णय घेतला होता. जोपर्यंत आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध होत नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुकीला मतदान करणार नाही व ग्रामपंचायतचा कोणताच कर भरणार नाही, असे यावेळी ग्रामस्थांनी सांगितले. मागील लोकसभा निवडणुकीतही ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. त्यावेळी तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी समस्या जाणून घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. परंतु लेखी आश्वासन न मिळाल्याने नागरिक आपल्या निर्णयावर ठाम राहिले होते. आत्ता विधानसभा निवडणुकीतही हा बहिष्कार त्यांनी कायम ठेवला.
भैरवनाथनगर ग्रामस्थांना गेली ५० वर्षापसून मागणी करूनही कोणत्याही आवश्यक गरजा पूर्ण झाल्या नाहीत. अनेकवेळा ग्रामस्थांनी मागणी करूनही त्याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने यापुढील काळात जोपर्यंत आम्हाला सर्व जीवनावश्सुयक सुविधा मिळत नाहीत. तोपर्यंत सर्व निवडणुकीवर आम्ही बहिष्कार टाकत आहे. ग्रामपंचायत कोणताच कर भरणा करणार नाही.
– प्रकाश कांबळे, ग्रामस्थ, भैरवनाथनगर, तळेगाव ढमढेरे.





