पुणे जिल्हा : वेल्ह्यात भाजपचा उत्साह दुणावला

आगामी लोकसभा, विधानसभेसाठी भाजपची व्यूहरचना
वेल्हे – नुकत्याच झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळविल्याने देशभरातील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे वेल्हे तालुक्यातील भारतीय जनता पार्टीबरोबरच सताधारी महायुतीचे घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट यांचे कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण आहे. पक्षीय राजकारणाला तिलांजली देत अनेक ठिकाणी सत्तेच्या माध्यमातून गावच्या विकास करणारा पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे या विजयाचा आनंदोत्सव सर्वत्र साजरा केला जात असून त्याचे प्रदर्शन वेगवेगळ्या माध्यमातून पाहायला मिळत आहे.
राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर दुभंगलेली शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या दोन्ही गटांमध्ये कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले असताना या विचित्र राजकीय जुळवाजुळवीमुळे भविष्यामध्ये सत्तेत असलेल्या महायुतीला राज्यात सत्ता गमवावी लागणार, असे अनेकांना वाटत होते. मात्र, पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये लागलेल्या निकालामुळे राज्यातील सत्ताधाऱ्यांमध्ये हत्तीचे बळ आले आहे.
कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. यास वेल्हे तालुकाही मागे राहिला नाही. खासदार सुप्रिया सुळे यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामती मतदारसंघातील वेल्हे तालुक्यामध्ये या तीनही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी या विजयाचा आनंद प्रत्येक गावागावात पेढे वाटून साजरा केला. मात्र, काँग्रेस पक्षाच्या गोटात कमालीची स्मशान शांतता असून यावर कोणीच प्रतिक्रिया द्यायला तयार नाही.
मतदारसंख्येने लहान असलेल्या वेल्हे तालुक्यामध्ये प्रत्येक निवडणुकांमध्ये जनतेचा वेगवेगळा कौल मिळाला आहे. लोकसभेला कायमच या तालुक्याने खासदार सुळे यांना भरभरून मत दिली तर विधानसभेला हाच मतदार माजी मंत्री अनंतराव थोपटे व विद्यमान आमदार संग्राम थोपटे यांच्या मागे ठामपणे उभा राहिल्याचे आत्तापर्यंतचे चित्र आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्या मध्येच नेहमी काट्याची टक्कर झाली आहे.
पंचायत समितीवर एकदा शिवसेनेचा सभापती झाला. त्यानंतर एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे दोन पंचायत समिती सदस्य या तालुक्यातून निवडून गेले. मात्र, खरी लढत ही नेहमीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातच झाल्याचे आत्तापर्यंतचे चित्र आहे. अनेक ग्रामपंचायती या दोन पक्षाच्या ताब्यात असून. राष्ट्रवादीच्या दोन गटानंतर भविष्यामध्ये कोणती राजकीय समीकरणे जुळून येतात, हेच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गट व मुखयमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिवसेनेचे सहकार्याने भाजपने तालुक्यात आपले पाय पसरायला सुरुवात केली आहे. भाजपाकडे आकर्षित होणाऱ्या तरुणाईची संख्या वाढली आहे.
सत्तेशिवाय शहाणपण नाही, विकास पण नाही, याची कल्पना गाव पातळीवरील लोकप्रतिनिधींना चांगली अवगत झाल्यामुळे प्रत्येकजण सत्ताधाऱ्यांच्या बरोबर राहून आपल्या गावासाठी कशाप्रकारे निधी आणता येईल याचा विचार जास्त करीत आहे. त्यामुळे कोण कोणत्या पक्षाचा यापेक्षा कोण निधी देणारा हेच धोरण सध्या वेल्हे तालुक्यात चालू आहे.
– संजय लिम्हण, माजी सरपंच, गुंजवणे
ग्रामविकासाबरोबरच गावागावांमध्ये वैयक्तिक लाभाच्या योजना कशा प्रकारे मिळवता येतील या दृष्टीने मतदारांमध्ये जागृती झाली असून. या योजनांचे लाभ मिळवायचे असतील तर सत्तेमध्ये असणाऱ्या लोकांबरोबरच राहणे गरजेचे आहे. मिळेल त्या योजनेचा फायदा घेण्याकडे अनेकांचा अधिक कल असल्याचे चित्र आहे.
– विजय शिंदे, सामाजिक कार्यकर्ते, केळद.
पक्षीय राजकारणामुळे अनेक गावे विकासापासून वंचित राहिली आहेत. अनेकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता आला नाही. कितीतरी कुटुंबांचे एकमेकात वादविवाद झाले. या सर्व गोष्टींची जाणीव मनात ठेऊन मतदारराजा सुद्धा जागृत झाला आहे. त्याचे एकच धोरण सत्तेत कोण, हे नाही पहायचे. वेल्हे तालुक्याचा सर्वांगीण विकास हेच धोरण आहे.
– सतीश लिम्हण, ग्रामपंचायत सदस्य, गुंजवणे.





