Pune District : कांदा पिकासाठी जैविक बुरशीचा वापर करावा

पळसदेव : सध्या कांदा पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव दिसत असल्याचे चित्र आहे. त्यासाठी शेतकर्यांनी ड्रायकोडर्मा व सुडोमोनास या जैविक बुरशीचा वापर करावा. इतर रोगाचा प्रादुर्भाव झाल्यास कृषी विभागाशी संपर्क करून मार्गदर्शन घ्यावे, असे मत मंडळ कृषी अधिकारी किरण पिसाळ यांनी व्यक्त केले.
कांदा पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव अशा आशयाचे वृत्त दैनिक प्रभातने प्रकाशित केले होते. त्यानुसार कृषी विभागाने पळसदेव, माळेवाडी, न्हावी, शेलारपट्टा, काळेवाडी भागात कांदा उत्पादक शेतकर्यांच्या शेतात जाऊन कांदा पिकाची पाहणी करून मार्गदर्शन केले. या वेळी कृषी पर्यवेक्षक जी. डी. खंडागळे यांच्या सहकार्याने कृषी सहाय्यक गणपत खांडेकर उपस्थित होते.
मंडळ कृषी अधिकारी किरण पिसाळ म्हणाले, तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पळसदेव भागात कांदा उत्पादक शेतकर्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात येईल. शेतकर्यांनी आपल्या कांदा पीकबाबत रोग व व्यवस्थापनबाबत काही मार्गदर्शन आवश्यक असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधायला हवा.
कांदा पिकाबाबत वेळेवर औषध फवारणी व आवश्यक खते दिल्यास चांगल्या प्रकारे कांद्याचे उत्पन्न घेता येईल. त्यामुळे शेतकर्यांनी कांदा पिकाची योग्य काळजी घ्यावी.





