Pune District : दुचाकी चोरट्याला ६ महिने सश्रम कारावास

राजगुरुनगर : आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुचाकी चोरणाऱ्या अट्टल चोरट्यास राजगुरुनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस बी नाईकनवरे यांनी सहा महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. श्रीकांत आत्माराम चौधरी (वय २६, रा शेलारवस्ती, तळवडे, ता. हवेली) असे शिक्षा झालेल्या चोरट्याचे नाव आहे.
आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत १३ सप्टेंबर २०२४ रोजी चऱ्होली खुर्द गावात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास स्पेंडर दुचाकी चोरून नेली होती. याबाबत निवृत्ती भीमराव वाडेकर यांनी आळंदी पोलिसांत तक्रार दिली होती. तर दि. ३ सप्टेंबर रोजी ज्ञानेश्वर धोंडीराम क्षीरसागर यांची राहत्या घरासमोरून होंडा शाईन दुचाकी चोरी झाल्याची फिर्याद आळंदी पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलीस हवालदार पी. बी. वाहिले यांनी तपास करून श्रीकांत आत्माराम चौधरी (वय २६) या दुचाकी चोरट्याला शिताफीने अटक केली होती व या गुन्ह्याचा तपास केला होता.
हा खटला राजगुरुनगर येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. बी. नाईकनवरे यांच्यापुढे सुरू होता. सरकारी पक्षाच्या वतीने सहाय्यक सरकारी अभियोक्ता पी एस वाळके, श्रीमती के. डी. सोनवणे यांनी दोन्ही चोरीच्या गुन्ह्यात १० साक्षीदार तपासले. सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद आणि फिर्यादीची साक्ष यावर आरोपी श्रीकांत आत्माराम चौधरीला दोषी धरण्यात आले.
भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये आरोपीला ६ महिने सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. या खटल्यात कोर्ट पैरवी म्हणून आळंदी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कावळे यांनी काम पहिले.





