पुणे जिल्हा : राज्यात प्रथमच वाजणार अभ्यासासाठी भोंगा

वेल्ह्यातील गुंजवणे गावात दक्षतेसाठीही अनोखा उपक्रम
विलास बांदल
वेल्हे – गुंजवणे (ता. वेल्हे) गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत अभ्यासाचा भोंगा या नावाचा सहशालेय उपक्रम सुरू करण्यात आला असून, या उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी (दि. 4) वेल्हे पंचायत समितीचे माजी सभापती दिनकर सरपाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. याबरोबरच गावातील काही महत्त्वाच्या सूचनांबाबत दक्षता भोंगाही वाजवण्यात येणार असून, अशा प्रकारचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग आहे.
यावेळी वेल्ह्याचे सहायक पोलीस निरीक्षक रणजीत पठारे, सहायक गटविकास अधिकारी महेश पांढरे, माजी गटशिक्षणाधिकारी पोपट नलावडे, शिक्षण विस्तार अधिकारी दीपकर नलावडे, विस्तार अधिकारी शकील मुल्ला, सरपंच गुलाब रसाळ, ग्रामपंचायत पंचायत सदस्य राजाभाऊ रसाळ, बाळासाहेब शिळीमकर, पोलीस पाटील बाळासाहेब रसाळ, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मोहन पडवळ, मुख्याध्यापक हेमंत कांबळे, उपशिक्षक अशोक खेडेकर, महेंद्र मोहिते उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य राजाभाऊ रसाळ यांनी अंगणवाडीतील मुलांना गणवेश वाटप केले. यावेळी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारीसाठी अभ्यासिका सुरू करण्यात आली आहे. अभ्यासिकेसाठी ग्रामसेवक संदेश यादव यांनी पुस्तके भेट दिली. या भोंग्याचे सर्व वादन व नियोजन विस्मय फाउंडेशनचे संस्थापक समीर काका घोले यांच्यामार्फत होणार आहे.
अभ्यासाचा आणि दक्षतेचा इशारा देणारा भोंगा उपक्रम उल्लेखनीय आहे. या उपक्रमाचे तंतोतंत पालन झाल्यास राज्यातील खेडोपाड्यात तो प्रसिद्ध आणि अनुकरणीय होईल.
– दिनेश पारगे, तहसीलदार वेल्हे
भोंगा वाजविण्याचे नियम
24 तासांमध्ये तीन वेळा भोंगा वाजणार आहे. सकाळी 6 वाजता भोंगा वाजेल तेव्हा पहिलीपासून कोणत्याही शाखेत पदवीचे शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थ्यांनी उठायचे आहे. सकाळची सर्व कामे करून राहिलेला अभ्यास पूर्ण करून शाळे जाण्याची तयारी करायची आहे. संध्याकाळी 6 वाजता भोंगा वाजेल यावेळी गावातील सर्व विद्यार्थी एकाच वेळी अभ्यासाला बसतील. रात्री 8 वाजता पुन्हा भोंगा वाजेल तेव्हा सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यास बंद करून जेवण करून आराम करायचा आहे.
उपक्रमाचा उद्देश
पुणे जिल्ह्यात अभ्यासाचा भोंगा या अभिनव उपक्रमाचा उद्देश मोबाइलच्या अतिवापरामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत आहे. या उपकरणांचा अतिवापर होणार नाही याची दक्षता घेऊन विद्यार्थी अभ्यासात मग्न होतील, हा असून, ग्रामीण भागातील मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी, अभ्यासाची सवय लागावी, रोज दोन तास मुलांना अभ्यास सराव करता यावा, अभ्यासात मागे असणाऱ्या मुलांसाठी वाढीव प्रयत्न करणे, स्पर्धा परीक्षेची तयारी करावी, तसेच गावामध्ये शैक्षणिकदृष्ट्या सुसूत्रतता आणणे आदी बाबींचा विचार करून आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
गावात दक्षतेसाठीही इशारा
सलग तीन वेळा भोंगा वाजला तर गावामध्ये काहीतरी आपत्कालीन गोष्ट घडली असून ग्रामस्थांना एकत्र बोलवण्याचा हा इशारा असेल. सलग पाच वेळा भोंगा वाजला तर गावामध्ये कोणाचे तरी निधन झाले आहे असे समजावे.





