Pune District: भीमाशंकर कारखान्यास वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट कारखाना पुरस्कार

मंचर : दत्तात्रयनगर,पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक, येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा सन २०२३-२४ करीता “देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” जाहीर झाला आहे. देशातील २०२३-२४ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांच्यामार्फत या पुरस्काराची शुक्रवार, दि.२१ रोजी घोषणा करण्यात आली, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
बाळासाहेब बेंडे म्हणाले की, मूल्यमापनाच्या आधारे पुरस्कार निवड समितीने श्रेणी अंतर्गत पुरस्कारासाठी निवड केली आहे. पुरस्कार वितरण सोहळा नवी दिल्ली येथे होणार आहे. माजी सहकारमंत्री व कारखान्याचे संस्थापक दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत, कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
कारखान्याचे संस्थापक व माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच पुरस्कार प्राप्त करणे शक्य झाले आहे. यापूर्वी कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १५, असे एकूण २८ पुरस्कार प्राप्त झालेले आहे.
हा पुरस्कार सातव्यांदा…
“देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार” ७ वेळा मिळविणारा देशातील एकमेव साखर कारखाना आहे, अशी माहिती उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी दिली. कारखान्याचे संस्थापक व माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कारखान्याचे संचालक मंडळ, सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.





