खेडचे आमदार बाबाजी काळे यांच्या पाठपुराव्यास यश राजगुरूनगर – श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्याची अंमलबजावणी तातडीने सुरू करून या क्षेत्राचा सुनियोजितपणे विकास करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला केल्याची माहिती खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत शुक्रवारी (दि. 27) झालेल्या बैठकीत श्री क्षेत्र भीमाशंकरच्या 288.17 कोटींच्या विकास आराखड्यास मान्यता देण्यात आली. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, सचिव डॉ. श्रीकर परदेशी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी श्री क्षेत्र भीमाशंकरच्या विकासकामांबाबत सविस्तर सादरीकरण केले. आमदार काळे म्हणाले की, श्रीक्षेत्र भीमाशंकरला मोठ्या संख्येने भाविक आणि पर्यटक येतात, त्यांना केंद्रबिंदू मानून विविध दर्जेदार सुविधा विकसित होणार आहेत. या परिसराला लाभलेल्या नैसर्गिक सृष्टीसौंदर्याची पार्श्वभूमी लक्षात घेऊन तेथे ’इको टुरिझम’ संकल्पना विकसित होणार आहे. वनभ्रमण पथ, त्याचबरोबर पर्यटक, भाविकांसाठी ’रोप वे’ची सुविधा विकसित होईल. पर्यटकांसाठी हॉटेल, रेस्टॉरंट आणि निवास सुविधा उपलब्ध होणार आहेत. भीमाशंकर येथील दळणवळण सुविधा, वाहतूक मार्ग, अंतर्गत रस्ते यांच्या विकासास प्राधान्य ठेऊन या ठिकाणी हेलिपॅड सुविधा उपलब्ध करून देणार आहे. या परिसराचा विकास करताना स्थानिक व्यावसायिक, दुकानदारांना नवीन दुकाने उपलब्ध होणार आहेत. आमदार काळे पुढे म्हणाले की, भीमाशंकर मंदिर परिसरात महादेव वन विकसित केले जाणार आहे. वन्यजीव माहिती केंद्र उभारून स्थानिक वन्यजीव आणि अभयारण्यांवरील माहिती पुरविणार, जेणेकरून पर्यटकांना येथील जैवविविधता आणि संरक्षणाची माहिती मिळू शकेल. पर्यटकांच्या विश्रांतीसाठी आणि निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेण्यासाठी 7 एकर जागेत आदर्श उद्यान तयार करणे. भारताचा नकाशा 4 एकर जागेत तयार केला जाईल. भारतातील 12 ज्योतिर्लिंगांची मिनी-प्रतिमा दर्शवणारा नकाशा बनवून जेथे पर्यटक भारताच्या धार्मिक स्थळांचा अनुभव घेऊ शकतात. पायवाटेवर रेलिंग असतील, जे निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव घेणार्या पर्यटकांसाठी सुरक्षित आणि आरामदायक असतील. बॉम्बे पॉइंटवर पर्यटनासाठी आरामदायक विश्रांती स्थळे आणि दृष्य स्थळे निर्माण केली जातील, ज्या वन विभागाच्या देखरेखीखाली चालवण्यात येतील. महादेव वनाला एक पर्यावरणीय दृष्ट्या टिकाऊ आणि आध्यात्मिकदृष्ट्या समृद्ध ठिकाण बनविणे. जिथे वन्यजीव संरक्षण आणि पर्यटकांना आवश्यक असलेल्या सुविधा एकत्र असतील. निसर्गाचे संवर्धन करत जागतिक दर्जाच्या पर्यावरणीय पर्यटनाचा अनुभव दिला जाईल. नवीन मार्गाची निर्मिती या विकास आराखड्यात राजगुरूनगरकडून भीमाशंकर मंदिरापर्यंत सुकर, जलद आणि सुरक्षित प्रवासासाठी नवीन मार्गाची निर्मिती केली जाणार आहे. भोरगिरी हा इको-सेंसिटिव झोन असून राजगुरुनगर – शिरगाव – टोकवडे – भोरगिरी – गुप्त भीमाशंकर – साक्षी गणेश – हनुमान मंदिर – भीमाशंकर ज्योतिर्लिंग मंदिर असा मार्ग तयार होईल. या मार्गात भोरगिरी येथे वनक्षेत्रात 100 एकर खासगी जागा उपलब्ध आहे. हे क्षेत्र अधिग्रहित न्यास येथे भाविक आणि पर्यटकांसाठी समतल करून पार्किंग आणि इतर सुविधा उपलब्ध करून देता येतील. हा विकास इको-सेंसिटिव झोनच्या नियमाधीन राहून करता येईल. जंगलातून ट्रेकिंग आणि वॉकिंग ट्रेल तयार केली जाईल, ज्यामुळे भाविकांना निसर्गाचा आणि आध्यात्मिक अनुभव घेता येईल. यामध्ये गुप्त भीमाशंकर, साक्षी गणेश, हनुमान मंदिर आणि इतर धार्मिक स्थळांचा समावेश असेल. ट्रेल वापरणार्या भाविकांना भीमाशंकर मंदिरापर्यंत चालत पोहोचता येईल. या मार्गावर विश्रामस्थळे, सूचना फलक आणि सुरक्षेची व्यवस्था केली जाईल. पारंपरिक वास्तुकलेत भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या कोटेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार करून भीमा नदीवरील घाटाची निर्मिती केली जाणार आहे. 2027 मध्ये ’साईड-पिलिग्रिमेज’ म्हणून भीमाशंकरला प्रतिदिन 1 लाख भाविक भेट देऊ शकतात. त्यासाठी 100 पुरुष प्रसाधनगृहे, 150 महिला प्रसाधनगृहे, 200 मूत्रविसर्जनगृहे आणि 50 स्नानगृहे बांधली जाणार आहेत. भोरगिरी परिसरात 27. 98 कोटी रुपयांची कामे करण्यात येणार असून त्यासाठी 5. 80 कोटी रूपयांची तरतूद भूसंपादनासाठी केली आहे. मंदिर परिसरात पोलीस चौकी आणि पोलीस विश्रामगृह उभारण्यात येणार आहे. -बाबाजी काळे, आमदार, खेड-आळंदी