पुणे जिल्हा : भीमाशंकरला सर्वोत्कृष्ट कारखान्याचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

पारगाव शिंगवे /मंचर : दत्तात्रयनगर पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्ली यांचा सन २०२२-२३ हंगामामधील वसंतदादा पाटील “देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” पुरस्कार केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी दिली.
शनिवार दि. १० ऑगस्ट रोजी नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि. नवी दिल्ली यांचे वार्षिक सर्वसाधारण सभा व “शुगरकेन अॅन्ड बायो एनर्जी – पॉवर ऑफ विकसित भारत” विषयावरील एकदिवसीय परिषदेमध्ये देशातील सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
यावेळी केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल, उत्तर प्रदेश राज्याचे साखर व ऊस विकासमंत्री चौधरी लक्ष्मण नारायण, गुजरातचे माजी मंत्री ईश्वरभाई पटेल, नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि., नवी दिल्लीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, उपाध्यक्ष केतनभाई पटेल, कार्यकारी संचालक प्रकाश नाईकनवरे तसेच देशातील साखर उद्योगातील अनेक मान्यवर उपस्थित होते. भीमाशंकर कारखान्याचा पुरस्कार अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, संचालक अशोक घुले, रामचंद्र ढोबळे, बाबासाहेब खालकर, शांताराम हिंगे,
आनंदराव शिंदे, मच्छिंद्र गावडे, अंकित जाधव, अरुण चासकर, बाजीराव बारवे, सीताराम लोहोट, ज्ञानेश्वर अस्वारे, नितीन वाव्हळ, रामहरी पोंदे, पोपटराव थिटे, गणेश कोकणे, पुष्पलता जाधव, प्रिया बाणखेले, कार्यकारी संचालक चंद्रकांत ढगे, टेक्निकल मॅनेजर शिरीष सुर्वे व सेक्रेटरी रामनाथ हिंगे यांनी स्वीकारला. कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पुरस्काराबाबत माहिती देताना म्हणाले, आर्थिक वर्षात केलेली ऊस उत्पादकता, तांत्रिक गुणवत्ता, वित्तीय व्यवस्थापन, अधिकतम ऊस गाळप, साखर उतारा, ऊस वाढीच्या योजना, कर्ज परतफेड, व्याज, खर्चात केलेली बचत,
कमीत कमी उत्पादन खर्च, केलेली गुंतवणूक, वेळेत अदा केलेला ऊस दर, ऊस उत्पादकांना दिलेली ठेवीची पासबुके, संचित नफा, कारखान्याचे नक्त मुल्य, शिल्लक कर्ज उभारणी मर्यादा, कारखान्याने उभारणी केलेला व उपलब्ध निधी, विनियोगासाठी केलेले नियोजन, शिक्षण क्षेत्रातील योगदान व सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून केलेली कामे या सर्व बाबींचा विचार करून कारखान्यास हा पुरस्कार प्राप्त झाला आहे.
संस्थापकांच्या नेतृत्वामुळे यश शक्य…
सदर पुरस्कार प्राप्त होण्यास कारखान्याचे संस्थापक व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे दुरदृष्टी नेतृत्व व मार्गदर्शन, संचालक मंडळाचे धोरण, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे सुयोग्य व्यवस्थापन, ऊस उत्पादक व सभासद वर्गाची साथ यामुळेच शक्य झाले आहे. कारखान्यास देश पातळीवरील १३ व राज्य पातळीवरील १४, असे एकूण २७ पुरस्कार प्राप्त झालेले आहे. देशातील “सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना” पुरस्कार ६ वेळा मिळविणारा भीमाशंकर हा देशातील एकमेव साखर कारखाना असल्याची कारखान्याचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील यांनी दिली.





