आमदार कुल : तब्बल अडीच तास दिली उत्तरे दौंड – दौंड तालुक्यातील शेतकरी वर्गाची जीवनदायनी असलेला भीमा पाटस हा कारखाना केंद्र सरकार व राज्य सरकारची मदत घेवून सहकारीच राहिला असल्याने आज सभासद वर्गात आनंदाचे वातावरण असल्याचे मत भीमा पाटस कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांनी व्यक्त केले. भीमा पाटस कारखान्याची ४२ वी अधीमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना स्थळावर पार पडली. त्यावेळी कुल बोलत होते. यावेळी भीमा पाटस कारखान्याची यावर्षीची वार्षिक सभा ही विविध विषयांनी गाजली गेली. अनेक मुद्द्यांना हात घालत विरोधकांनी प्रश्नांचा भडीमार केला. मात्र, आमदार राहुल यांनी तब्बल अडीच तास या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे देत सर्वांना बोलण्याची संधी दिली. यावेळी माजी आमदार रमेश थोरात यांनी अहवालात (स्व) मधुकाका शितोळे यांचा फोटो छापला व सेवानिवृत्त कर्मचारी वर्गाचे पैसे १५ दिवसांत देत असल्याच्या कारणावरून आमदार कुल यांचे अभिनंदन केले. मात्र, भीमा पाटस हा कारखाना हा साईप्रिया का निराणी ग्रुप यापैकी नेमका कोणाला चालवायला दिला, याची माहिती सभासदांना कळावी, अशी मागणी केली. थोरात म्हणाले की, पुणे जिल्हा बँकेचा भीमा पाटस कारखान्यांशी करार झाला असल्याची आम्हाला प्रत मिळाली नाही. यावेळी कुल म्हणाले की, बँकेच्या कायदेशीर बाबी पूर्ण करून ना हरकत प्रमाणपत्र आल्याने आम्हांला कर्ज मिळाले आहे. या संदर्भात मी वारंवार उपमुख्यमंत्री अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. यावेळी नामदेव ताकवणे म्हणाले की, कारखाना भाड्याने दिला आहे की, संस्था भाड्याने दिली आहे. या प्रश्नाला उत्तर देताना कुल म्हणाले की, पुणे जिल्हा बँक व महाराष्ट्र बँक यांच्या सहमतीने कारखाना भाड्याने दिला आहे. संस्था दिली नाही. सभासद वर्गाच्या हितासाठी हा निर्णय घ्यावा लागला आहे. यावेळी राजाभाऊ तांबे यांनी आमदार कुल यांना प्रश्न विचारत घेराव घालण्याचा प्रयत्न केला मात्र आमदार कुल यांनी सिजनेबल पुढारी असा उल्लेख केल्या नंतर सभेत एकच हशा पिकला. यावेळी कारखान्याचे निवृत्त कामगार केशव दिवेकर म्हणाले की, आमचे कारखाना प्रशासना बरोबर सकारात्मक चर्चा चालू असून १०० टक्के रक्कम आम्हाला मिळाली जावून आम्हाला न्याय मिळाला जाईल असे सांगितले. यावेळी दीपक दिवेकर, राजाभाऊ कदम, दशरथ दिवेकर, तात्या ताम्हाणे, वसंत साळुंके, बापूसाहेब भागवत यांनी प्रश्न उत्तरांचा भडीमार केला. विषय वाचन कार्यकारी संचालक तुषार पवार यांनी केले. सूत्रसंचालन विकास शेलार यांनी केले. कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव बारवकर यांनी स्वागत केले. संचालक तुकाराम ताकवणे यांनी आभार मानले. जास्तीत जास्त ऊस द्या- कुल कारखान्यामध्ये १ लाख साखर पोती ही २७ कोटी ४५ लाख ७९६ रुपयांची शिल्लक असून ही नेमकी कोठे आहेत. आज पाच वर्ष झाली आहेत असेल तर ती कोठे ठेवली आहेत, ते दाखवावे. याला उत्तर देताना कुल म्हणाले की, ज्यावेळी २४ जुलै २०२१ रोजी कारखाना आर्थिक अडचणीत आला. त्यावेळी जिल्हा बँक व महाराष्ट्र बँक यांनी पंचनामा करून ताबा घेतला. कारखान्याने पैशाची वसुली करीत कारखान्याचे टेंडर काढून कारखाना निराणी ग्रुपला २५ वर्षाच्या भाडेतत्वावर दिला. मात्र, हा कारखाना सहकारीच ठेवला आहे. तुम्ही जास्त ऊस देताल त्यावेळी निराणी ग्रुपची कर्ज वसुली होऊन कारखाना लवकरच कर्ज मुक्त होऊन निरानी ग्रुपकडून सभासदाच्या ताब्यात येईल.