Pune District : भक्तिरसात लोणी काळभोर ‘तल्लीन’

तुकोबाचा पालखी सोहळा पहिल्या मुक्कामी विसावला : हवेलीत स्वागत
लोणी काळभोर – माऊली… माऊली… ‘ज्ञानोबा.. तुकाराम’ चा जयघोष, पालखीच्या पुढे मागे दिंड्या, तुळशी वृंदावन घेतलेल्या वारकरी महिला, विणेकरी सोबतीला आसमंतांत घुमणारा टाळ – मृदुंगाचा गजर, देहभान विसरून विठ्ठल नामात दंग झालेले वारकरी, अशा भक्तिमय वातावरणात लाखो वारकऱ्यांसह पुण्याहून निघालेला जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर, कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील पालखी तळावर आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास विसावला.
यावेळी पंचक्रोशीत जणूू भक्तीचा मेळा लागल्याचा प्रत्यय आला. संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाले होते. हा सोहळा पंचक्रोशीतील भाविकांनी याची देही याची डोळा साठवला. सोहळ्याचे स्वागत ग्रामस्थांसमवेत विविध सामाजिक संस्था, संघटनांनी अपूर्व उत्साहात फुलांची उधळण करीत केले. यावेळी लोणी काळभोर परिसराला भक्तीच्या महासागराचे स्वरूप प्राप्त झालेे होते. पुण्यातील निवडुंग्या विठोबा मंदिरात रविवार (दि.२२) सकाळी पूजा झाल्यानंतर सकाळी पालखी रथात ठेवण्यात आली. पालखी सोहळा पुलगेट मार्गे हडपसर येथे आला. गाडीतळ येथे विसावा घेवून सोहळ्याने पुणे-सोलापूर महामार्गावरून लोणी काळभोरकडे मार्गक्रमण केले. शेवाळेवाडी ग्रामस्थांच्या स्वागताचा स्वीकार करून सोहळा मांजरी फार्म येथे दुपारच्या विसाव्यासाठी थांबला.
पुण्यातील दोन दिवसांच्या मुक्कामाने ताजेतवाने झालेले वारकरी, टाळकरी आणि फडकरी झपझप पावले टाकत होते. डोळे पंढरीकडे, मुखी विठूरायाच्या अखंड नामस्मरणाचा गजर करीत भक्तीरसात चिंब होऊन महामार्गावरील एक – एक टप्पा मागे टाकत पालखी सोहळा दिंड्यातील लाखो वारकऱ्यांसमवेत चालत होता.
मांजरी बुद्रुक येथील दुपारचा विसावा उरकून, संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट टोलनाक्यावर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास पोहोचताच रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या हजारो नागरिकांनी टाळ्या वाजवून पालखीचे व वारकऱ्यांचे स्वागत केले. यावेळी पालखी सोहळ्याचे शिरूर हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके, उपसरपंच नासिरखान पठाण, माजी सरपंच गौरी गायकवाड, माजी उपसरपंच देवीदास कदम, नवपरिवर्तन फौंडेशनचे अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड, युवराज काळभोर, रमेश भोसले, ग्रामपंचायत सदस्य आकाश काळभोर, कोमल काळभोर, बीना काळभोर, प्रीतम गायकवाड, राजश्री काळभोर, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे यांनी स्वागत केले.
आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्या वतीने वारकऱ्यांना रेनकोटचे वाटप केले. लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूलच्या २०० हून अधिक विद्यार्थ्यांनी टाळ मृदुंग व लेझीमच्या गजरात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी पालख्यांसह कदमवाकवस्ती व लोणी काळभोर येथील नागरिक टोलनाक्यापासून पालखी तळापर्यंत चालत गेले. अनेकांनी ‘सेल्फी’ टिपत ही आठवण मोबाइलमध्ये कैद केली. वाकवस्ती येथे पालखीचे साधना सहकारी बॅंकेचे संचालक सुभाष नरसिंग काळभोर, माजी उपसरपंच बाबाराजे काळभोर, देवीदास काळभोर, ऋषिकेश काळभोर, गौरव काळभोर व त्यांच्या सहकाऱ्यांनी केले.
छत्रपती संभाजी नगर येथे पुणे जिल्हा कुस्ती प्रशिक्षण केंद्राच्या वतीने महाराष्ट्र केसरी पै. राहूल काळभोर यांनी स्वागत केले. भारतीय जनता पक्षाच्या वतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले. लोणी स्टेशन येथे माजी सरपंच नंदू काळभोर व त्यांच्या सहका-यांनी स्वागत केले. वैष्णवी नर्सिंग होम व पूर्व हवेली डाॅक्टर्स असोसिएशनच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले होते.
शुभेच्छांचा वर्षाव घेत पालखी सोहळा लोणी स्टेशन चौकात सातच्या सुमारास पोहोचताच पालखीचे स्वागत फटाक्यांची आतषबाजी करून मोठ्या उत्साहात केले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती. लोणी स्टेशन येथील छोटा विसावा संपवून पालखी सोहळा मुक्कामासाठी कदमवाकवस्ती येथील पालखी तळावर संध्याकाळी साडेसातच्या सुमारास पोहोचली. पालखी तळावर आरती झाल्यानंतर लाखो वैष्णवांचा सोहळा विसावला.
सामाजिक, पर्यावरणाचा जागर
पृथ्वीराज कपूर मेमोरीयल हायस्कूलचे ढोल लेझीम पथक सर्वाचे लक्ष वेधून घेत होते. कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी हातात फलक घेऊन मुलगी वाचवा आणी वृक्षदिंडीद्वारे झाडे लावा, झाडे जगवा आणी पर्यावरण वाचवा असा संदेश देऊन जनजागृती केली. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या कलामंचच्या कलाकारांनी ग्रामस्वच्छता अभियान, महिला सबलीकरण व पर्यावरणाबाबत जनजागृती केली. यावेळी वन विभागाच्या वतीने प्रथमच एक झाड आईसाठी हा उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत एक हजार वड, पिंपळ, चिंच आदी वृक्षांचे वाटप करण्यात आले.
पालखी सोहळा पालखी तळावर मुक्कामी पोहोचल्यानंतर आरती झाली.यावेळी हवेलीचे उपविभागीय अधिकारी डॉ यशवंत माने, अप्पर तहसीलदार तृप्ती कोलते, मंडल अधिकारी लक्ष्मण भांडे, रूपाली सरतापे, माधुरी बागले, परिसरातील ग्राममहसुल अधिकारी, पोलीस पाटील लक्ष्मण काळभोर, प्रियांका भिसे, हवेली बाजार समितीचे सभापती दिलीप काळभोर, संचालक प्रशांत काळभोर, कदमवाकवस्तीचे उपसरपंच नासिरखान पठाण, ग्रामविकास अधिकारी अमोल घोळवे, लोणी काळभोरचे सरपंच भरत काळभोर, उपसरपंच गणेश कांबळे, ग्रामविकास अधिकारी एस एन गवारी, पंचायत समितीचे माजी सभापती अनिल टिळेकर, युगंधर काळभोर, माजी सरपंच गौरी गायकवाड, नवपरिवर्तन फौंडेशनचे संस्थापक अध्यक्ष चित्तरंजन गायकवाड उपस्थित होते. रात्री जागर व किर्तन झाले.
योगिनी एकादशीचा उपवास असल्याने सर्व वारक-यांना सर्व समाज घटकांतील सेवाभावी संस्थानी चहा व खिचडी, चिवडा, केळी आदी उपवासाच्या पदार्थांचे वाटप केले. रात्रभर भजन, किर्तन, जागर, प्रवचन व हरीनामाच्या जागरामुळे संपूर्ण लोणी काळभोर पंचक्रोशीतील परिसर विठ्ठलमय होवून झाला होता. पालखी तळावर पालखीचा मुक्काम असला तरी पालखी सोहळ्यातील बहुतांश दिंड्या गावातील मंदिरे, शाळा, कॉलेज व आपल्या नेहमीच्या ठिकाणी मुक्कामी होत्या. लोणी काळभोर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे व त्यांच्या सहका-यांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे.





