Pune District: आधार, मोबाईल लिंक न केल्यास लाभ होणार बंद

भोर : भोर तालुक्यात मार्च २०२५ अखेर शासनाचे पोर्टलवर ४५२६ लाभार्थ्यांचे आधार नोंदणी झाली असून शासनाचे पोर्टलवर आधार नोंदणी झालेल्या लाभार्थ्यांचे आधार संलग्न असलेल्या बँक खात्यात शासनाकडून मार्च २०२५ अखेर डीबीटीद्वारे थेट लाभ जमा करण्यात आलेला आहे. तरी लाभार्थ्यांनी गडबडून न जाता त्यांचे आधारकार्ड ज्या बँक खात्याशी सलग्न आहे, त्या बँकेत संपर्क साधावा.
तसेच आता आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आल्याने येथून पुढे आधार प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थ्यांचेच बँक खात्यावर अनुदान जमा करण्यात येणार आहे. तरी ज्या लाभार्थ्यांनी अद्याप आधारकार्ड व मोबाईल बँक खात्याशी संलग्न केलेले नाही, अशा लाभार्थ्यांनी तत्काळ आधार कार्ड व मोबाईल बँक खात्याशी संलग्न करून आधार प्रमाणीकरण करणेकामी तहसील कार्यालय भोर, संजय गांधी योजना शाखा येथे संपर्क साधावा, असे आवाहन तहसील कार्यालय भोर यांच्या वतीने तहसीलदार राजेंद्र नजन व नायब तहसीलदार प्रतिभा खाडे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.
आधार प्रमाणीकरण बंधनकारक…
संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांना आता आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आलेले आहे. परिणामी राज्य सरकारने जानेवारीपासून अनुदान, अशा प्रमाणीकरण केलेल्या लाभार्थ्यांनाच देण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फटका आधार प्रमाणीकरण नसलेल्या लाभार्थ्यांना बसलेला आहे.





